पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवा : आ सुनील टिंगरे यांनी विधानसभेत केली मागणी | पुढारी

पुणे : नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग हटवा : आ सुनील टिंगरे यांनी विधानसभेत केली मागणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नगर रस्ता आणि विश्रांतवाडी रस्त्यावरील बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ती सोडविण्यासाठी बीआरटी मार्ग काढून टाकावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांनी विधानसभेत गुरुवारी केली. तज्ज्ञांची समिती नेमून याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. टिंगरे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे या विषयाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, की सार्वजनिक वाहतूक सुधारणेसाठी 2006 मध्ये बीआरटी योजना सुरू केली.

मात्र, अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या, मॉल, आयटी, विमानतळ यामुळे नगर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीला अपुरा पडत आहे. त्यामुळे बीआरटी मार्ग काढून टाकण्याची नागरिकांची मागणी आहे. पोलिस आणि महापालिकाही त्यासाठी सकारात्मक आहे. प्रश्नांना उत्तर देताना सामंत म्हणाले, की नगर रस्त्यांवर मेट्रो प्रकल्पाच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. ते काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. बीआरटी योजनेबाबत तज्ज्ञांची समिती नेमून त्यावर निर्णय घेतला जाईल.

बीआरटी मार्गावर खासगी गाड्यांना परवानगी द्या : शिरोळे
वाहतूककोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील बीआरटी मार्गातून खासगी गाड्यांना जाण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधीवरील चर्चेत भाग घेताना केली. पीएमपी गाड्यांची संख्या कमी असून, दोन गाड्यांच्या वेळेत अंतर जास्त आहे. त्यामुळे खासगी बसगाड्यांना शुल्क आकारून जाण्यास परवानगी देण्याची सूचना त्यांनी केली.

Back to top button