पुणे : 841 जणांच्या मुसक्या आवळल्या; पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन | पुढारी

पुणे : 841 जणांच्या मुसक्या आवळल्या; पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : नववर्ष तसेच कोरेगाव भीमा येथील विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा तसेच स्थानिक पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीत तब्बल 4 हजार 91 गुन्हेगारांची तपासणी केली. या वेळी 841 जणांना अटक करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांसह विविध पथकांनी बुधवारी रात्री नऊ ते पहाटे दोन वाजेपर्यंत सर्च मोहीम राबवून 841 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्याशिवाय शस्त्र बाळगल्या प्रकरणात 38 जणांना अटक करून त्यांच्याकडून 40 कोयते, चार तलवारी, तीन सत्तूर असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रॉनतस्कराला अटक करून 10 लाख 76 हजारांचे एमडी जप्त केले.

गावठी दारू विक्रीप्रकरणी 46 केसेस करून 48 हजारांचा दारूसाठा जप्त करण्यात आला. सीआरपीसी कायद्यानुसार 76 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. जामिनावर कारागृहातून सुटून आलेल्या आरोपींनाही नोटीस देण्यात आली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त राजेंंद्र डहाळे, अपर आयुक्त रणजित कुमार, अपर आयुुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त स्मार्तना पाटील, उपायुक्त सुहैल शर्मा, उपायुक्त शशिकांत बोराटे, उपायुक्त विक्रांत देशमुख, वाहतूक उपायुक्त विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी कारवाई केली.

Back to top button