मंचर; पुढारी वृत्तसेवा : मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रांजणी येथील खंडणीबहाद्दर माहिती अधिकार कार्यकर्ता हरिश कानसकर याला मंचर पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.
हरिश महादू कानसकर (वय 47, रा. रांजणी, ता. आंबेगाव) याच्यावर सन 2021 आणि सन 2022 मध्ये खंडणी मागणे, मारामारी करणे, अपहरण करून खंडणी घेणे, अवैधरीत्या गुटखा, दारूची विक्री करणे, जबरी चोरी करणे, माहिती अधिकार अर्जाचा गैरवापर करून लोकांकडून खंडणी वसूल करणे, अतिक्रमण करून खंडणीची मागणी करणे, असे एकूण 13 विविध गुन्हे दाखल आहेत. त्याची मंचर पोलिस ठाणे हद्दीत प्रचंड दहशत निर्माण झाल्याने त्याला 1 वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव मंचर पोलिस ठाण्याने ग्रामीण पोलिस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्यांना सादर केला होता.
त्या प्रस्तावाचे अवलोकन करून जिल्हाधिकार्यांनी हरिश कानसकर याला 1 वर्षाकरिता येरवडा कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्याबाबत मंगळवारी (दि. 27) आदेश पारीत केला. त्यास मंचर पोलिसांनी ताब्यात घेऊन येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध केले.
याबाबत मंचरचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले की, मंचर पोलिस ठाणे हद्दीत समाजास धोकादायक ठरणार्या अशा समाजविघातक व्यक्तीवर तसेच माहिती अधिकाराचा गैरवापर करून गोरगरीब जनतेकडून खंडणी वसूल करणार्या इसमांवर यापुढेही अशाच प्रकारची कडक कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलिस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सतीश होडगर, पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर (स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण), सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर, पोलिस हवालदार राजेश नलावडे, महेश बनकर, पोलिस नाईक सोमनाथ वाफगावकर, पोलिस जवान अजित पवार आणि अविनाश दळवी यांनी केली.