पुणे : शिवस्मारक, आरक्षणाचा आमदारांना विसर; शिवसंग्राम संघटनेची खंत | पुढारी

पुणे : शिवस्मारक, आरक्षणाचा आमदारांना विसर; शिवसंग्राम संघटनेची खंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा; शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष स्व. आमदार विनायक मेटे यांच्या निधनानंतर मराठा समाजाप्रमाणेच मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे प्रश्न देखील पोरके झाले आहेत. विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले तरी उपरोक्त विषयांवर दोन्हीही सभागृहात एकाही सदस्याने साधा प्रश्न देखील विचारला नाही, अशी खंत शिवसंग्राम संघटनेचे प्रवक्ते तुषार काकडे, युवक प्रदेश अध्यक्ष उदयकुमार आहेर, शहर युवक अध्यक्ष नितीन ननवरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

मराठा समाजाच्या मागण्या मांडण्यासाठी हक्काचे आमदार असणे गरजेचे आहे. याकरीता विधान परिषदेतील कोणत्याही एका आमदाराचा राजीनामा घेऊन त्या जागी विनायकराव मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांना आमदार करावे अशी मागणी ही आहेर यांनी यावेळी केली. ज्या दिवसापासून महाराष्ट्राच्या विधी मंडळात मेटे यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या दिवसापासून अगदी शेवटच्या श्वासापर्यंत विधी मंडळाचे असे एकही अधिवेशन गेले नाही कि ज्या अधिवेशनात विनायकराव मेटे यांनी मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा प्रश्न सभागृहात मांडला नाही, त्यांनी फक्त प्रश्न मांडलाच असे नाही तर आग्रहपूर्वक तो लावून धरला. अनेकदा या विषयावर सभागृह बंद देखील पाडले व अनेक निर्णय सरकारला घेण्यास भाग पाडले.

मेटे यांच्या निधनानंतर बहुजन समाजा प्रमाणेच मराठा आरक्षण व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हे प्रश्न देखील पोरके झालेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागायची व राज्य चालवायचे. मात्र त्यांच्या स्मारकाच्या विषयाला जाणीव पूर्वक बाजुला ठेवायचे असा करंटेपणा सर्वच पक्षांकडुन सुरु असल्याचे दिसत आहे. अधिवेशनाच्या उर्वरित काळात तरी हे दोन्ही विषय सर्व पक्षीय आमदार मांडतील अशी अपेक्षा आहे. जागा नसल्यास विधान परिषदेच्या गटातून सत्ताधारी पक्षाच्या एखादया आमदाराचा राजीनामा घेऊन डॉ. ज्योती मेटे यांना त्या जागी आमदार म्हणून घ्यावे, अशी आग्रही मागणी तुषार काकडे यांनी यावेळी केली

Back to top button