इंदापूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; दर वाढल्याचा परिणाम | पुढारी

इंदापूर तालुक्यात गव्हाचे क्षेत्र वाढले; दर वाढल्याचा परिणाम

बावडा (ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात चालू रब्बी हंगामातील गहू पिकाची पेरणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, गेली काही महिन्यांपासून गव्हाच्या दरामध्ये वाढ झाल्यानेऱ चालू रब्बी हंगामात गहू पिकाखालील क्षेत्रातही वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या पेरणी केलेले गहू पीक वाढीच्या अवस्थेत आहे. इंदापूर तालुक्यात अनेक शेतकरी डिसेंबरअखेर गव्हाची पेरणी करतात. मात्र, दि.15 डिसेंबरपर्यंत पेरणी केलेल्या गहू पिकास समाधानकारक उत्पन्न मिळते, अशी माहिती शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी), एच. के. चव्हाण (भोडणी), विजयसिंह कानगुडे (शेटफळ हवेली), हरिभाऊ काकडे (बावडा) या शेतकर्‍यांनी दिली.

चालू वर्षी चांगल्या पावसाने शेतीसाठी सिंचनाची स्थिती समाधानकारक आहे. गहू पिकाच्या पेरणीसाठी एच.डी.-2189, लोकवन या वाणास शेतकर्‍यांची पसंती कायम आहे. अनेक शेतकर्‍यांनी उपलब्ध क्षेत्रावर गव्हाचे पीक हे वर्षभर घरी गहू खाण्यासाठी होईल, या हेतूने घेतले आहे. पंजाब राज्यातून येणार्‍या कम्बाईन हार्वेस्टिंग मशिनमुळे गहू पिकाची मळणी काही तासांतच उरकली जाते. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा फायदा गहू पिकाला झाल्याचे दिसून येत आहे. अनेक शेतकर्‍यांनी गव्हाचे पीक ऊस, फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून घेतले आहे, असे अमीर सय्यद (बावडा), अनिल जाधव (रेडणी), गणेश अनपट (भोडणी) यांनी सांगितले.

Back to top button