

सोमेश्वरनगर (ता. बारामती); पुढारी वृत्तसेवा : देशभरात महत्त्वाच्या पक्षांतील नेत्यांवर प्रेम करणारी जनता आपण पाहिली आहे. नेत्यांसाठी काहीही करायला तयार असलेले कार्यकर्तेही कमी नाहीत. मात्र, मतदार आपल्याला हवा असलेला सरपंच निवडून यावा, यासाठी देव पाण्यात ठेवतात व नवस देखील बोलतात. असा अनुभव वाणेवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच गीतांजली दिग्विजय जगताप यांना आला आहे. नुकत्याच बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. वाणेवाडीचीही निवडणूक पार पडली. यामध्ये गाव पॅनेलच्या विरोधात उभ्या असलेल्या गीतांजली दिग्विजय जगताप या सरपंचपदाला उभ्या होत्या.
त्यांच्यावरील असलेले निखळ प्रेम मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण गावाने अनुभवले. जगताप या निवडून याव्यात म्हणून कोणी शिर्डीच्या साईबाबाला नवस बोलले, कोणी शिरूरच्या देवभावराच्या देवीला नवस बोलले, कोणी मारुतीला पेढ्यांचे नवस बोलले, कोणी सोमेश्वरला जेवणाची पंगत घालण्याचा नवस बोलले, तर काही महिला मतदारांनी मतमोजणी दिवशी चक्क देवच पाण्यात घातल्याने जगताप यांच्यावरील प्रेम अधोरेखित झाले.
वाणेवाडीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मळशी-दत्तवाडी व विकासनगर-रामनगर या भागांतील मतदारांनी हे नवस बोलले होते.
यातील दोन मतदारांनी मारुतीला बोललेला पेढ्यांचा नवस पूर्ण केला असून, लवकरच सरपंच गीतांजली जगताप व त्यांचे पती दिग्विजय जगताप हे जोडीने मतदारांसह राहिलेले नवस पूर्ण करणार आहेत.
विकासाचा मुद्दा ठरला प्रभावी
सर्वसामान्य मतदारांनी मनात आणले तर काहीही घडू शकते, याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल. तालुक्यातील निवडणुकीत पदाधिकार्यांनी विकासाचा मुद्दा प्रचारात न घेता गट-तट, गावकी-भावकीवर निवडणूक लढली. मात्र, सर्वसामान्यांच्या अडचणीत धावून जाणार्या दिग्विजय जगताप यांच्यासारख्या तरुणांना मतदार संधी देतात, हेच या निवडणुकीत अधोरेखित झाले आहे.
गावकारभार्यांच्या पॅनेलला धोबीपछाड
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेले गाव म्हणून वाणेवाडीची ओळख आहे. वाणेवाडी (ता. बारामती) येथे गावकारभार्यांनी एकत्र येत उभारलेल्या पॅनेलला अपक्ष उमेदवारांनी जोरदार धक्का दिला. अपक्ष उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी तब्बल 403 मते घेत विजयश्री खेचून आणली. तेरापैकी नऊ सदस्यांचे बहुमत गावकरी पॅनेलच्या पदरात पडले आहे. मतदारांनी चार अपक्षांनाही निवडून दिले आहे. वाणेवाडी ग्रामपंचायतीला बिनविरोध निवडणुकीची परंपरा असली तरी या वेळी त्यात यश आले नाही.