जनावरांच्या बाजारावरील निर्बंध अखेर उठविले; चाकणला शनिवारी भरणार सर्व गुरांचा बाजार | पुढारी

जनावरांच्या बाजारावरील निर्बंध अखेर उठविले; चाकणला शनिवारी भरणार सर्व गुरांचा बाजार

चाकण; पुढारी वृत्तसेवा : लम्पीमुळे जनावरांच्या बाजारावर लावण्यात आलेले निर्बंध उठविण्यात आले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती, खेडच्या येथील महात्मा फुले मार्केटयार्डात सर्व जनावरांचा बाजार शनिवार (दि. 31) पासून पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. लम्पीबाधित क्षेत्र घोषित झाल्यानंतर जनावरांचे आठवडे बाजार बंद होते. परंतु, जिल्हाधिकारी यांनी 26 डिसेंबरच्या आदेशान्वये चाकण येथील जनावरांचा बाजार (गाय, बैल, म्हैस, रेडे आदी) पुन्हा शनिवार (दि. 31)पासून नियमित सुरू होणार आहेत. सदरील बाजारामध्ये जनावरे विक्रीस आणावीत, असे आवाहन बाजार समितीने केले आहे.

जनावरे विक्रीस आणताना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीने केले आहे. जनावरे निरोगी असल्याची खात्री करूनच जनावरे बाजारात आणावीत. जनावरांना लम्पी प्रतिबंधक लसीकरण केले असावे, कानात टॅग, नंबर, बिल्ला असावा. विहित नमुन्यातील आरोग्य दाखला व वाहतूक प्रमाणपत्र सोबत असावे, असे बाजार समितीचे प्रशासक हरिश्चंद्र कांबळे व सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले. चाकण येथील बाजारात परराज्यातील व्यापारी, खरेदीदार आवर्जून येतात. या माध्यमातून होणार्‍या उलाढालीतून बाजार समितीला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. मागील तीन महिने बाजार बंद होता. त्यामुळे बाजार समितीचे उत्पन्न बंद होते.

Back to top button