वजनकाटे दुरुस्ती एजन्सीचा बेल्ह्यातून पोबारा; ग्राहकांच्या आर्थिक लुटीला बसला चाप | पुढारी

वजनकाटे दुरुस्ती एजन्सीचा बेल्ह्यातून पोबारा; ग्राहकांच्या आर्थिक लुटीला बसला चाप

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वजनकाटे दुरुस्तीच्या नावाखाली तालुक्यातील सहकारी संस्था, व्यापारी व अन्य छोट्या-मोठ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लूट सुरू असल्याच्या तक्रारीचे वृत्त दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध होताच संबंधित दुरुस्ती एजन्सी बेल्ह्यातून गायब झाली आहे.
बेल्हे येथील विसावा चौकातील ग्रामपंचायतीच्या एका गाळ्यात मागील चार ते पाच दिवसांपासून काही खासगी एजन्सींमार्फत इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल काटे वजन व मापन करण्याची उपकरणे दुरुस्तीचे काम सुरू होते.

अनेक ग्राहकांकडून प्रतिकाट्यामागे सुमारे 2 ते 10 हजारांपर्यंत फी आकारली जात आहे. तालुक्यात विविध सहकारी संस्था, पेट्रोल पंपचालक, किराणा व्यावसायिक, भाजीपाला व्यावसायिकांना वजनकाटे वापरावे लागतात. दरवर्षी वर्षातून दोनदा कॅम्पच्या नावाखाली ग्राहकांची सरकारच्या फीव्यतिरिक्त लूट होत असल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या आहेत.

व्यापारी आणि दुकानदारांनी केलेल्या तक्रारींबाबत दै. ‘पुढारी’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच बेल्हेतील विसावा चौकात ग्रामपंचायत व्यापारी गाळ्यात सुरू असलेले वजनकाटे दुरुस्ती केंद्र गायब झाले. परिसरातील दुकानदारांकडे चौकशी केली असता त्यांच्या लुटीविषयी दै. ‘पुढारी’मध्ये बातमी आल्याने त्यांनी दुरुस्ती केंद्र बंद करून दुरुस्ती केंद्राचा फलक आणि साहित्य मारुती गाडीत टाकून निघून गेले, असे सांगितले.

Back to top button