नायगाव : बेशिस्त कृषी अधिकार्‍यांवर कारवाई करा : पांडुरंग देवकर | पुढारी

नायगाव : बेशिस्त कृषी अधिकार्‍यांवर कारवाई करा : पांडुरंग देवकर

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकारी हे कामाच्या ठिकाणी वेळेत उपस्थित राहत नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पांडुरंग देवकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी कृषी अधिकारी वेळेत उपस्थित न राहणे ही बाब नियमबाह्य आहे. हे कृषी अधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत का उपस्थित राहत नाहीत, याचा खुलासा घेण्यात यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे.

कृषी अधिकारी यांना उपस्थिती रजिस्टर व फिरतीसाठी फिरती नोंद रजिस्टर सुरू करण्याचा आदेश यांना देण्यात आला होता. परंतु, या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत नसल्याचे दिसत आहे. कृषी अधिकारी यांना गटविकास अधिकारी यांचा वरदहस्त तर नाही ना, असा सवाल देवकर यांनी उपस्थित केला आहे. कृषी अधिकारी यांच्या कार्यालयीन कामात गुणवत्ता नसून, बर्‍याचदा नागरिक व शेतकरी यांच्या तक्रारीवरून कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबनाची कारवाई जिल्हास्तरीय पथकाकडून करण्यात आली, असेही निवेदनात म्हटले आहे.

यामुळे शासकीय नियमासह स्वयंशिस्तीचे पालन न करणार्‍या, कार्यालयीन कामात कामचुकारपणा, बेजबाबदारपणा करणार्‍या, कामात गुणवता न राखणार्‍या कृषी विभागातील अंतर्गत गटबाजीतून शेतकरी यांची पिळवणूक करणार्‍या कृषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पांडुरंग देवकर यांनी केली.

Back to top button