

कुरकुंभ (ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : महिंद्रा कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून दौंड तालुक्यासाठी नवीन रोजगारनिर्मितीची मोठी संधी समोर आली आहे. दौंडच्या नेतृत्वाने या नव्या संधीचे सोने केल्यास तालुक्यासह अन्य भागांतील हजारो तरुण-तरुणींना सोयीच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होईल. दौंड तालुक्याची आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल, हे नाकारून चालणार नाही.
महिंद्राचा इलेक्ट्रिक वाहननिर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यातील पुरंदर, भोर व दौंड मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्रात व्हावा, अशी मागणी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. दौंड विधानसभा मतदारसंघात कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र केमिकल, फार्मा व फूड झोन असले; तरी रोजगारासाठी त्यावर समाधान न मानता रासायनिक (केमिकल) प्रकल्प सोडून कुरकुंभसह दौंड तालुक्याच्या अन्य भागांत नवीन प्रकल्प होणे गरजेचे आहे.
विजय शिवतारे यांनी नि:स्वार्थपणे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागात महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहननिर्मिती प्रकल्पासाठी केलेली मागणी ही काळाची गरज आहे. दौंडच्या आमदारांनीही शिवतारे यांना पाठिंबा देत या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्र्यांना गळ घालावी. दौंड तालुक्यात स्थानिकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध नाहीत. बाजारपेठेतील उलाढाल दिवसेंदिवस कमी होत आहे. अनेक जण पुण्यासारख्या मोठ्या शहरात मिळेल ते काम करतात. बेरोजगारांची संख्या वाढत आहे. यातून मार्ग काढून दौंड तालुक्याची परिस्थिती बदलण्याची संधी आली आहे.
शिंदे व फडणवीस सरकारमधील भाजपचे दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल तसेच माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यासाठी या नव्या प्रकल्पासाठी दौंड तालुक्याची निवड करून सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, हे फार अवघड नाही. विशेषतः येथील भौगोलिक परिस्थिती प्रकल्पासाठी योग्य ठरणारी आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामुळे पाणी, विजेचा प्रश्नच नाही. तालुक्यात दौंड रेल्वेचे जंक्शन आहे. पुणे-सोलापूर व मनमाड-बेळगाव, असे दोन राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत.
पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा या चार महत्त्वाच्या जिल्ह्यांची जवळीक आहे. अशा मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकल्प झाल्यास रोजगाराचा प्रश्न मिटण्यास मोठी मदत होईल. त्याचबरोबर दळणवळणात मोठा साकारात्मक बदल होईल. प्रशिक्षणार्थी होतकरू तरुण- तरुणींना रोजगार मिळेल. इंजिनिअरिंग, आयटीआय यांसारखे शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधार्थ भटकणार्या अनेकांच्या नोकरीची उत्तम सोय होईल. त्यासाठी दौंड तालुक्यात या नव्या प्रकल्पाची स्वप्नपूर्ती पूर्ण होणे गरजेचे आहे.