कुसगाव खिंड रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक हैराण | पुढारी

कुसगाव खिंड रस्त्याचे काम रखडल्याने नागरिक हैराण

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : वेल्हे, भोर व हवेली तालुके जवळच्या अंतराने जोडणार्‍या मांगदरी ते कुसगाव खिंड रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांसह पर्यटक हैराण झाले आहेत. खड्डे पडून निगडे बुद्रुक ते कुसगाव खिंडपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
तातडीने खड्डे बुजवून रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, अशी मागणी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तानाजी मांगडे यांनी केली आहे.

राजगड, तोरणा भागात जाणार्‍या पर्यटकांची तसेच सिंहगड, खेड शिवापूर, पुणे परिसरातील कामधंद्यासाठी जाणार्‍या स्थानिकांना खड्ड्यांतून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. कुसगाव पासून ते बोरावळे फाटा, निगडे बुद्रुकपर्यंतच्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याची खड्डे पडून चाळण झाली आहे.

स्थानिक कार्यकर्ते संतोष चोरघे म्हणाले की, कोळवडी, कातवडी, वांगणीवाडी, निगडे, मागदरी, बोरावळे आदी गावांतील विद्यार्थी, कामगार अनेक गावचे रहिवासी जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत. खड्ड्यात वाहने घसरून अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय संकपाळ म्हणाले की, या रस्त्याचे काम करण्यासाठी निधी मंजूर आहे. त्यात दोन ठिकाणी काम सुरू आहे. याबाबत संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.

Back to top button