पुणे : तरुणीला दहा लाखांचा गंडा | पुढारी

पुणे : तरुणीला दहा लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा

मी अमेरिका सरकारचा गुप्तचर अधिकारी आहे. माझ्याकडे भारत, अमेरिका आणि दुबईची जबाबदारी असल्याचे सांगत एका तोतयाने उच्चशिक्षित तरुणीला 10 लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार औंध येथे शुक्रवारी उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत या तोतया गुप्तचर अधिकार्‍याला बारामती येथून बेड्या ठोकल्या आहेत. त्याला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अमित चव्हाण (वय 30, रा. पाटण) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत धायरी येथील एका 28 वर्षीय तरुणीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेली तरुणी फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात काम करते. संशयित अमित हा चाकण परिसरात तिच्याबरोबर राहत होता. एप्रिल 2021 मध्ये अमित आणि या तरुणीची ‘बेटर हाफ’ या सोशल मीडिया साईटवर भेट झाली होती. यावेळी त्याने तिला आपण अमेरिकेतील गुप्तचर विभागातील अधिकारी असल्याचे सांगितले होते. 154 देशांची आपल्यावर नजर असल्याचे त्याने सांगितले. भारतात तपासासाठी आलो असल्याची थाप मारून त्याने तिला विश्वासात घेतले.
याच दरम्यान त्याने तिच्याशी संपर्क करून तिला लग्नाची मागणी घातली. यावेळी त्याने स्वतःची ओळख राहुल राजाराम पाटील अशी करून दिली. याच दरम्यान दोघे बाणेर येथे भेटले. तेथे त्याने तरुणीला तिचा मोबाईल क्रमांक दिला. त्याच्यावर विश्वास ठेवून तिनेही तिचा मोबाईल त्याला दिला. काही दिवसांनी त्याने तिला तुझ्यावर रॉची (रिसर्च अ‍ॅनालिसिस टीम) नजर असल्याची भीती घातली आणि तिचा लॅपटॉप फॉरमॅट करण्यास सांगितला. विविध कारणे सांगून त्याने तिचे सिमकार्ड, एटीएम कार्डही ताब्यात घेतले. त्यानंतर तिला त्याच्या मिहीर जैन या मित्राचे सूरत, गुजरात येथील टेक्स्टाईल कंपनीतून कमी किमतीत व लवकर मटेरिअल मिळवून देतो, असे आमिष दाखविले. याशिवाय वारंवार तिला रॉची भीती दाखवून त्याने तिच्या खात्यातून तब्बल 8 लाख 37 हजार रुपये आपल्या खात्यात वळविले. तिचा अ‍ॅपल कंपनीचा 1 लाख 28 हजारांच्या लॅपटॉपही पळवला. असे एकूण त्याने तरुणीकडून दहा लाख रुपये घेतले.
याच दरम्यान, रॉच्या अधिकार्‍यांपासून वाचण्यासाठी माझा मोबाईल एक महिना बंद असेल, असे त्याने सांगितले. परंतु एक महिन्यानंतरही त्याचा मोबाईल बंद असल्याचे लक्षात आल्याने तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने पोलिस ठाणे गाठून त्याच्या विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करीत त्याने केलेली तोतयेगिरी उघड केली.

Back to top button