पुणे : विक्रम गोखलेंच्या पुरस्कारांचे जतन करणार | पुढारी

पुणे : विक्रम गोखलेंच्या पुरस्कारांचे जतन करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना देश-विदेशात मिळालेल्या सन्मान, पुरस्कारांचे जतन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात केले जाणार आहे. गोखले यांनी ते हयात असताना विद्यापीठाच्या माध्यम व संज्ञापन अभ्यास (डीसीएस) विभागाकडे 175 पुरस्कार सुपूर्त केले असून, हे पुरस्कार विभागाच्या ग्रंथालयात दर्शनी भागात लावले जाणार आहेत.

विक्रम गोखले यांना त्यांच्या कारकिर्दीत शेकडो पुरस्कार मिळाले. हे पुरस्कार त्यांनी काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या डीसीएस विभागाला देण्याची इच्छा दर्शविली. विभागानेही ती मान्य केल्यानंतर गोखले यांनी हे सर्व पुरस्कार विद्यापीठाकडे सुपूर्त केले. या पुरस्कारांसाठी योग्य जागा निवडून त्या ठिकाणी माहिती प्रदर्शित करून गोखले यांच्याच हस्ते त्याचे उद्घाटन करायचे, असा विद्यापीठ प्रशासनाचा मानस होता. मात्र, त्यापूर्वीच गोखले यांचे निधन झाल्याने हा कार्यक्रम होऊ शकला नाही.

यामुळे आता कोणताही कार्यक्रम न करता या पुरस्कारांचे जतन करून त्यांना दर्शनी भागात स्थान दिले जाईल, असे विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. गोखले यांना 1967 सालापासून मिळालेल्या पुरस्कारांचा यामध्ये समावेश आहे. 1967-68 आणि 1969-70 या दोन वर्षांमध्ये गोखले यांना महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता.

याशिवाय सिडनी रेडिओचे पदक, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटात मिळालेले पुरस्कार, पु. ल. देशपांडे, विष्णुदास भावे, राजा परांजपे यांच्या नावाने मिळालेले पुरस्कार तसेच सिंगापूर, दुबई, कतार, अमेरिका येथील विविध संस्थांकडून जाहीर झालेले 175 पुरस्कार विद्यापीठात जतन केले जाणार आहेत. या पुरस्कारांच्या निमित्ताने गोखले यांनी केलेल्या कामाची आठवण विभागात कायम राहणार असून, विद्यापीठात माध्यम, संज्ञापनाचे शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या विद्यार्थ्यांना हे पुरस्कार प्रेरणादायी ठरतील, असेदेखील विद्यापीठाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button