पुणे : भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक | पुढारी

पुणे : भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने 67 लाखांची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लिलाव भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने 67 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शंकर लक्ष्मण गायकवाड (रा. मोरेश्वर अपार्टमेंट, रास्ता पेठ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रकाश किशोर प्रजापती (वय 29, रा. साईनगर, कोंढवा) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2020 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाडने लिलाव भिशी सुरू केली होती. दरमहा लिलाव भिशीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने दाखविले होते. तसेच टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलच्या व्यवसायात पैसे गुंतविल्यानंतर परतावा देतो, असे सांगत होता. प्रजापती व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडून गायकवाडने पैसे घेतले. गायकवाडने प्रजापती यांना परतावा दिला नाही.

प्रजापती यांची एकूण 32 लाख रुपयांची फसवणूक केली. गायकवाडने लिलाव भिशीत गुंतवणुकीच्या आमिषाने राहुल दत्तात्रय वनारसे यांच्याकडून 25 लाख 50 हजार रुपये, आशाराणी रमेश नायकवडी यांची 10 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गायकवाड पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस उपनिरीक्षक मीरा र्त्यंबके तपास करत आहेत.

साडेआठ लाखांची पोंदेवाडीत चोरी
भिगवणजवळील पोंधवडी येथील एका शेतकर्‍याच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून तब्बल साडेआठ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. उत्तम बाबासो बंडगर (वय 45, रा. बंडगरवस्ती पोंधवडी, ता. इंदापूर) यांनी याबाबत भिगवण पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे. दि. 26 ते 27 च्या रात्री अज्ञात चोरट्याने बंडगर यांचे राहते परंतु बंद घराचे कुलूप कशाने तरी तोडून आत प्रवेश केला. या वेळी चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने असा एकूण 8 लाख 35 हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.

Back to top button