

पुणे : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या विविध भागात मान्सून सक्रिय झाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर चांगलाच वाढण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यात जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे बळीराजा धास्तावला होता. दुबार पेरणीच्या संकटाने त्याची चिंता वाढली होती. आता मात्र राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाने कमी-अधिक प्रमाणात लावलेल्या हजेरीने पाण्याअभावी करपून चाललेल्या खरिपाच्या पिकांना दिलासा मिळणार आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने ओढ दिली. गडचिरोली आणि चंद्रपूर वगळता उर्वरित विदर्भातही पाऊस पडला नाही. परिणामी राज्याच्या कमाल आणि किमान तापमात मोठी वाढ झाल्याने भर पावसाळ्यात उन्हाळा अनुभवायला मिळाला. आत मात्र पुढील काही दिवसांमध्ये पडणार्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आला आहे. यात पहिल्या आठवड्यात (9 ते 15 जुलै) राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात होणार आहे. पूर्व मराठवाडा आणि लगतच्या विदर्भात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे. 16 ते 22 जुलै या काळात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. उत्तर कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सात जिल्ह्यांत पावसाची ओढ
शुक्रवारी राज्यात पावसाने कमी-अधिक पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, सात जिल्ह्यांत अद्यापही दमदार पावसाची आवश्यकता आहे. तेथील खरिपातील पिके अडचणीत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात संततधार पावसाने सर्वदूर हजेरी लावल्यास खरीप पिकांची स्थिती आणखी चांगली होण्याचा अंदाज कृषी आयुक्तालयातून वर्तविण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कमबॅक
मे महिन्याच्या अखेरपासून ते जून महिन्याचे पहिले 20 दिवस धुवाँधारपणे बरसल्यानंतर गेल्या 15 दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील भात लावणीच्या कामांना ब्रेक लागला होता. मधले आठ-दहा दिवस अक्षरशः कडाक्याचे ऊन पडत होते. त्यानंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस अधूनमधून पडत होता. शुक्रवारी मात्र जिल्ह्याच्या बहुतांशी भागात दिवसभरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला असून रखडलेली भातलावणीची कामे आता वेगाने सुरू झाली आहेत. शुक्रवारी दुपारपासून जिल्ह्याच्या बर्याचशा भागात पाऊस बरसला. त्यामुळे गेेले काही दिवस उकाड्याने हैराण झालेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. त्यामुळे भात लावणीच्या कामांना शेतकर्यांनी वेग दिला आहे. आता लावणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र पावसाच्या सातत्यावरच या कामांचे भवितव्य अवलंबून आहे.
सांगली जिल्ह्यात दमदार पाऊस
ऐन पावसाळ्यात महिनाभर दडी मारलेल्या वरुणराजाने शुक्रवारी पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या विविध भागात दुपारपासून दमदार पाऊस झाला. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे ओढे, नाले यांना पूर आला आहे.
सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी बाराच्या सुमारास शहर तसेच परिसरात पावसाला सुरुवात झाली. बुधगाव, माधवनगर भागातही पावसाचे दमदार हजेरी लावली. तासगाव तालुक्याच्या पूर्व भागासह ग्रामीण भागाला सायंकाळनंतर रात्रीपर्यंत मुसळधार पावसाने झोडपून काढले. सलग तीन ते चार तास पडलेल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
अकोला, वर्ध्यात पावसाची हजेरी
पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी नागपुरात जोरदार हजेरी लावली होती. त्यानंतर शुक्रवारी विदर्भाच्या काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.
अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने संकटात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळाले. तसेच ज्यांची पेरणी राहिली आहे, अशा शेतकर्यांची लगबग सुरू झाली आहे. तेल्हारा तालुक्यात सर्वाधिक 20.8 मि.मी. पाऊस झाला. त्यापाठोपाठ बाळापूर, अकोला, अकोट, बार्शी टाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यात पाऊस झाला.
वर्धा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस बरसला. काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस आला. बुधवारी रात्री काही भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर गुरुवारी आणि शुक्रवारीही पाऊस झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे.