तब्बल 24 वर्षानंतर पहिल्यांदाच शरद पवार जाणार पुण्याच्या ‘काँग्रेस भवन’मध्ये | पुढारी

तब्बल 24 वर्षानंतर पहिल्यांदाच शरद पवार जाणार पुण्याच्या 'काँग्रेस भवन'मध्ये

पुढारी ऑनलाईन: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पवार हे कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तब्बल 24 वर्षानंतर पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत. बुधवार २८ डिसेंबर रोजी काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस आहे. यानिमित्त संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पुणे काँग्रेसच्या वतीनं देखील स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. काँग्रेस पक्षाकडून पुणे शहरातील सर्व पक्षातील नेत्यांना कॉंग्रेस पक्ष कार्यालयात चहापाणाला आमंत्रित करण्यात आलं आहे. खासदार शरद पवार यांनी देखील आमंत्रण दिलं असून, त्यांनी ते स्वीकारले आहे. ते आज संध्याकाळी सात वाजता पुण्यातील काँग्रेस भवनला भेट देणार आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच कॉंग्रेस भवनच्या प्रांगणात जाणार आहेत. 1999 मध्ये शरद पवार हे कॉंग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली होती. यानंतर शरद पवार यांनी कधीही पुण्यातील कॉंग्रेस भवनात पाय ठेवला नव्हता. तसेच कॉंग्रेस भवनातील कुठल्याही कार्यक्रमाला उपस्थिती लावली नव्हती. कॉंग्रेस पक्षाबरोबर युती असतानाही शरद पवार कधीही कॉंग्रेस भवन येथे आले नाही. त्यांनी कायम कॉंग्रेस पक्ष सोडल्यानंतर कॉंग्रेस भवन येथे जाणे टाळले होते. मात्र, आज शरद पवार हे 24 वर्षानंतर प्रथम पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये जाणार आहेत.

सर्वपक्षीय पदाधिकारीही येणार

काँग्रेस पक्षाच्या वतीनं दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त पुण्यात कार्यक्रमाचे आयोजन केलं जाते. पुणे शहराची एक वेगळी अशी संस्कृती आहे. पक्षाच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वच स्तरातील व्यक्तींना आमंत्रीत करत असतो, असल्याची माहिती काँग्रेसच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी मी खासदार शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना कार्यक्रमाला येण्याचं आमंत्रण दिलं. हे आमंत्रण त्यांनी स्वीकारलं असून आज ते काँग्रेस भवनमध्ये येणार असल्याची माहिती काँग्रेसचे नेते आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली. पवार यांच्या बरोबर शाहू छत्रपती हे देखील येणार आहेत. तसेच भाजप, शिवसेना, मनसे, एमआयएमचे नेते देखील काँग्रेस भवनमध्ये येणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Back to top button