बिबवेवाडीत दस्त नोंदणी संथ | पुढारी

बिबवेवाडीत दस्त नोंदणी संथ

 बिबवेवाडी : पुढारी वृत्तसेवा : बिबवेवाडी परिसरातील पुष्प मंगल कार्यालयाच्या परिसरात असलेले दस्त नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊन होत आहे. यामुळे दस्त नोंदणी प्रक्रिया अतिशय संथ गतीने होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
पुणे शहरांमध्ये जागा, घर व इतर मालमत्ता खरेदी, विक्रीच्या दस्त नोंदणीसाठी हवेली निबंधक कार्यालयांतर्गत शहरात एकूण 27 उपकार्यालये आहेत. त्यामध्ये दररोज हजारो दस्तांची नोंदणी केली जाते, परंतु गेले काही दिवसांपासून या कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्याने या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

बिबवेवाडी परिसरातील पुष्प मंगल कार्यालयाच्या परिसरात असलेल्या दस्त नोंदणी कार्यालयात यामुळे सध्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. लाखो रुपयांचे ऑनलाइन स्टॅम्प व फी भरणा करूनसुद्धा चाळीस मिनिटांत होणार्‍या कामाला जवळपास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत आहे.  यामुळे दस्त नोंदणीसाठी येणार्‍या नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. कार्यालयाच्या परिसरात दलालांचा सुळसुळाट झाला आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलण्याची मागणी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

पुणे शहरातील काही दस्त नोंदणी कार्यालयामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या तातडीने सोडवून नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दस्त नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरळीत केली जाईल.
-गोविंद कराड,  नोंदणी उपमहानिरीक्षक

Back to top button