पुणे : धायरीत रखडलेल्या डीपी रस्त्याची मोजणी | पुढारी

पुणे : धायरीत रखडलेल्या डीपी रस्त्याची मोजणी

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : धायरी-सिंहगड रस्ता परिसरातील अनेक वर्षांपासून रखडलेले डीपी रस्ते मार्गी लावण्यासाठी आम आदमी पक्षाने उपोषणाचा दणका देताच  प्रशासनाला खडबडून जाग आली. त्यानंतर महापालिकेने धायरी येथील प्रस्तावित 60 फुटी डीपी रस्त्याच्या मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते व माजी उपसरपंच धनंजय बेनकर यांनी गेल्या महिन्यात या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांसह उपोषण आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे. धायरी येथील बेनकरवस्तीतील सर्व्हे क्रमांक 6, 7, 8 मधून डीपी रस्ता प्रस्तावित आहे.

धायरी येथील डीपी रस्ते अद्यापही कागदावरच आहेत. पुरेशा रस्त्याअभावी वाहतूक कोंडी होत आहे, याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले होते. पक्षाचे राज्य संघटक व शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, राज्य प्रवक्ते डॉ. अभिजित मोरे, आबासाहेब कांबळे, प्रभाकर कोंढाळकर, सुनीता काळे, बेनकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.  सिंहगड रस्ता बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. एस. पाटील म्हणाले की, या रस्त्याच्या जागेची मोजणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल संबंधित विभागाला सादर करण्यात येणार आहे.

डीपी रस्त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. रस्त्यासाठी जमीन संपादन करण्यात येणार्‍या शेतकर्‍यांना शासन निर्णयानुसार योग्य मोबदला व कुटुंबातील एका व्यक्तीला महापालिकेत नोकरी देण्यात यावी. प्रत्यक्षात रस्ते होईपर्यंत लढा सुरू राहणार आहे.
                       – धनंजय बेनकर, अध्यक्ष, डीपी रोड कृती समिती, धायरी गाव

Back to top button