पुणे : नगरपालिकेचा निर्णय आगीतून फुफाट्यात ! | पुढारी

पुणे : नगरपालिकेचा निर्णय आगीतून फुफाट्यात !

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेने वेळीच कर कमी केला असता, तर फुरसुंगी गाव महापालिकेतून वगळण्याची वेळ आली नसती. नगरपालिका होणार ठीक आहे; पण फुरसुंगीतील टीपी स्कीमला आता कोणाकडून निधी मिळणार? आमचा गावचा विकास आराखडा कोण बनविणार? गावचा चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी नगरपालिका सक्षम आहे का? सर्वसामान्य ग्रामस्थांना फक्त कर कमी होणे गरजेचे होते. मात्र, त्याऐवजी नगरपालिका करण्याचा निर्णय म्हणजे आगीतून फुफाट्यात आल्याची भावना फुरसुंगीतील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.  फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावचा बराचसा भाग विकसित होण्याचा बाकी आहे.

एक वेळेस मान्य केले नगरपालिकेतर्फे विकास आराखडा होईल; पण तो कधी होईल, तो तेवढ्या परिणामकारक पद्धतीने होईल का आणि जर वेळेत विकास आराखडा झाला नाही, तर याठिकाणी अनधिकृत बांधकामे वाढणार आहेत. रस्ते अरुंद होणार आहेत. झोपडपट्टी तयार होण्याचा धोका आहे. रहिवासी क्रीडांगणे, उद्याने, सांस्कृतिक कला-क्रीडा केंद्रे, सर्व सोयींनीयुक्त सरकारी दवाखाने, भाजी मंडई, वाहनतळ, सार्वजनिक स्वच्छतागृहे या सुविधांपासून वंचित राहणार आहे. त्यामुळे गावचा बकालपणा वाढण्याचा धोका आहे.
अनधिकृत बांधकामे, गोडाऊनचा कर कमी होणार आहे.

परंतु, यामुळे सामान्य नागरिकांचा पाणी, वीज, रस्ते, कचरा समस्या मिटणार आहेत का ? ही गावे महापालिकेत आल्यामुळे अधिकृत सदनिका विकत घेतल्या त्यांचे म्हणणे कोणी ऐकून घेतले आहे का? सर्वसामान्य लोकांची मते जाणून घेतली आहेत का? असा सवाल उपस्थित करत येथील कर कमी झाला पाहिजे. याबाबत दुमत नाही; पण फक्त काही राजकीय लोकांच्या पुनर्वसनासाठी नगरपालिकेचा हट्ट धरणे म्हणजे गावाला बकालपणाच्या दरीत लोटण्यासारखे असल्याचे मत काही स्थानिक ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी व्यक्त केले.
स्थानिक शेतकरी बाबूराव भाडळे म्हणाले की, शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी बांधाच्या रस्त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्याठिकाणी टीपी स्कीमच्या माध्यमातून महापालिका चांगल्या पद्धतीचे रस्ते उभारणार आहे. मात्र, नगरपालिका करण्याच्या राजकीय खेळीसाठी आम्ही अजून किती दिवस विकासाची वाट पाहायची?

नगरपालिकेच्या निर्णयामुळे फुरसुंगीचा विकास आराखडा

रिंगरोड कधी होणार? टीपी स्कीममधील शेतकर्‍यांना योग्य मोबदला व पर्यायी जागा कधी भेटणार, यासह विविध प्रश्न उपस्थित आहेत. ज्यांना नगरपालिका हवी त्यांनी शेतकर्‍यांचे होणारे नुकसानही भरून द्यावे. – सागर हरपळे, शेतकरी, फुरसुंगी

गेल्या तीन-चार वर्षांपासून महापालिकेच्या माध्यमातून टीपी स्कीम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. राज्यातील एक आदर्श टीपी स्कीम महापालिकेच्या माध्यमातून याठिकाणी उभी राहणार होती. मात्र, नगरपालिका करण्याच्या निर्णयामुळे या योजनेला खोडा बसणार आहे.
                          – ज्ञानेश्वर कामठे, माजी ग्रामपंचायत सदस्य, फुरसुंगी

फुरसुंगीचा नियोजनबद्ध विकास करायचा असेल, तर तो महापालिकेमार्फतच होऊ शकतो. त्यामुळे ही गावे महापालिकेतून वगळण्याच्या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे. कर कमी झालाच पाहिजे, याबाबत दुमत नाही; पण विकासासाठी महापालिकेशिवाय पर्याय नाही.

Back to top button