पुणे : ‘ती’ ची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर

पुणे : ‘ती’ ची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीत विनयभंग आणि बलात्काराच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. एकाच दिवसात शहरातील विविध पोलिस ठाण्यांत सात विनयभंगाच्या, तर दोन बलात्काराच्या घटना दाखल झाल्या आहेत. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका 16 वर्षांच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून इंदापूर येथील एका तरुणाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुभम नावाच्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबरदरम्यान घडला.

दरम्यान, उत्तरप्रदेशाचा रहिवासी असलेला व उत्तरप्रदेशातच कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल असलेल्या पतीने आपल्याच पत्नीवर तिची इच्छा नसताना बलात्कार तसेच अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात बलात्कार व अनैसर्गिक कृत्य व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 20 डिसेंबर रोजी कल्याणीनगर परिसरात घडला.

दरम्यान, कुत्रा फिरविण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणीला कुत्र्याला ट्रेनिंग देतो, असे सांगून तरुणीला प्रपोज करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करून विनयभंग करणार्‍या हरी कारा (रा. सोपानबाग, वानवडी) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2022 ते 26 डिसेंबर 2022 दरम्यान घोरपडी येथे घडला. याप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे.
दुसर्‍या विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये आईसोबत झोपलेल्या 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग आईचा मित्र असलेल्या एकाने केला. राजेश कासर (26, रा. कोपरगाव, अहमदनगर) याच्यावर 12 वर्षांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वेळी आरोपीने छोटा चाकू घेऊन तिला गप्प बसण्यासाठी धमकावल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

तिसर्‍या विनयभंगाच्या घटनेत 35 वर्षीय महिलेकडे अश्लील नजरेने पाहून तिच्या कामाच्या ठिकाणी तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग करत तिला धमकावणार्‍या एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय गणेश राठोड (रा. जय जवाननगर, येरवडा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 35 वर्षीय महिलेनी तक्रार दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2022 ते 26 डिसेंबरदरम्यान घडला. चौथ्या घटनेत महिला महापालिका ते तळेगाव ढमढेरे पीएमपीएल बसने प्रवास करत असताना चंदननगर बायपास येथे बस आली असता गर्दीचा फायदा घेऊन महिलेला अश्लील पध्दतीने स्पर्श करून विनयभंग करणार्‍या नवल बाळकृष्ण पाटील (48, रा. निराबाई हॉस्पिटल, कोरेगाव, ता. शिरूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 37 वर्षीय महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दिली आहे. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.

धुणीभांडी करण्यासाठी निघालेल्या महिलेचा हात पकडून तिला 'मला तू खूप आवडते' म्हणत तसेच आक्षेपार्ह पध्दतीने बोलून विनयभंग करणार्‍या एकाला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली. सचिन दादू भोंडे (34, रा. उत्तमनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 डिसेंबरला दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडला.
शहरात घडलेल्या सहाव्या विनयभंगाच्या घटनेत दोघांनी अल्पवयीन मुलीचा गाडीवरून पाठलाग करून विचित्र पध्दतीने आवाज देऊन तुझ्याशी बोलायचे आहे म्हणत, तू मला आवडते म्हणून विनयभंग करत अंगावर धावून जाणार्‍या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश राजू धीरे (20) आणि आमिर हुसेन बाशा (20, दोघेही रा. कोथरूड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी विनयभंग आणि पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकीचा पती हा दुसर्‍याच्या पत्नीसोबत फोनवर बोलत असल्याचे समजल्यानंतर झालेल्या वादाच्या घटनेनंतर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आंबेगाव खुर्द येथे राहणार्‍या एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 27 वर्षीय महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंग तसेच धमकावल्याप्रकरणी तक्रार दिली आहे. हा प्रकार 25 डिसेंबर रोजी चार वाजता घडला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news