

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : दिलखेच अदा आणि नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा निमगाव केतकीच्या यात्रेत होणारा कार्यक्रम सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आला.
निमगाव केतकी येथील गणेश जयंतीनिमित्त यात्रेमध्ये मंगळवारी (दि. 27) गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमावर बंदी घालावी अशी मागणी जोर धरत असताना हा रद्द झालेला कार्यक्रम आता चर्चेचा विषय ठरला आहे.
गौतमी पाटील ही सोशल मीडियावर ओळखीचा आणि प्रसिद्ध चेहरा आहे. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने गौतमीने तरुणाईला वेड लावले आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून लावणी डान्सर म्हणून तिला ओळखले जाते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने होणारी गर्दी, त्यामध्ये बेभान होऊ नाचणारी तरुणाई आणि घडणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारी म्हणून गौतमी पाटील देखील आता सावध पवित्रा घेत आहे. त्याच पद्धतीने निमगाव केतकी येथील गणेश यात्रेत गौतमी पाटील हिचा आयोजित केलेला कार्यक्रम सुरक्षेचे कारण देत रद्द करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.