मोठा अनर्थ टळला! कॅम्प भागात अनाथ आश्रमाला मध्यराञी आग; 100 मुलांची सुखरुप सुटका | पुढारी

मोठा अनर्थ टळला! कॅम्प भागात अनाथ आश्रमाला मध्यराञी आग; 100 मुलांची सुखरुप सुटका

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्याच्या कॅम्प परिसरातील ईस्ट स्ट्रीटवर असणाऱ्या तय्यबीया मुलांच्या अनाथ आश्रमात अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीने 100 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशामन दलाकडून वर्तविण्यात आला आहे.

कॅम्प परिसरात तय्यबीया अनाथ मुलांचे चार मजली आश्रम (ट्रस्ट) आहे. चार मजली असणारया इमारतीत तळमजल्यावर आग लागल्याचे पाहून नागरिकांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. आग लागल्याची वर्दि अग्निशमन दल नियंत्रण कक्षाला मिळताच दलाकडून मुख्यालयातील एक अग्निशमन वाहन व देवदूत वाहन तसेच पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन वाहन ही घटनास्थळी काही मिनिटांच्या आत दाखल झाले. यावेळी काही मुले झोपलेल्या अवस्थतेत असताना त्यांना आपल्या सहकारी मित्रांनी व तेथील कर्मचार्‍यांनी उठवले.

मोठ्या प्रमाणात धुर झाल्याचे निदर्शनास येताच जवानांनी तातडीने इमारतीत असणार्‍या जवळपास 100 मुलांना (वय 06 ते 16 वर्षे) आग व धूर यापासून सुरक्षित ठिकाणी सुखरुपपणे हलवले. यावेळी मुलांना काही तास कॅम्पातील रस्त्यावरच बसून रहावे लागले. मुलांना सुखरूप ठिकाणी हलवून अग्निशमन दलाने मोठा धोका दूर केला. त्याचवेळी आगीवर पाण्याचा मारा करत अवघ्या 10 मिनिटात आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टाळला. यामध्ये कोणतीही जिवीत हाणी किंवा कोणी जखमी झाले नाही. मात्र या आगीमधे इमारतीच्या तळमजल्यावर साठा केलेल्या धान्याचे व इतर काही साहित्याचे नुकसान झाले.

आगीचे संकट दुर झाल्यानंतर मुलांना पुन्हा आश्रमात हलविण्यात आले. पुणे अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी प्रदीप खेडेकर, वाहन चालक अतुल मोहिते, तांडेल – चंद्रकांत गावडे व जवान आझीम शेख, गौरव कांबळे तर पुणे कॅन्टोमेंट अग्निशमन दलाचे तांडेल – आसिफ शेख, वाहनचालक ओंकार ससाणे व जवान प्रमोद चव्हाण, कुंडलित गायकवाड, सचिन भगत, निखिल जगताप, पंकज रसाळ यांनी हा अनर्थ टाळला.

Back to top button