पुणे : पीएमपी कर्मचार्‍यांना गिफ्ट! नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सातवा वेतन आयोग लागू | पुढारी

पुणे : पीएमपी कर्मचार्‍यांना गिफ्ट! नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सातवा वेतन आयोग लागू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला पीएमपी कर्मचार्‍यांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. येत्या नवीन वर्षात पीएमपी कर्मचार्‍यांना 50 टक्क्यांनी वेतन वाढून सातवा वेतन आयोग लागू होणार आहे, तर उर्वरित 50 टक्के फेब्रुवारी महिन्यात लागू होणार आहे. पीएमपी कर्मचार्‍यांना मिळालेले हे नवीन वर्षाचे गिफ्टच असणार आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाला. मात्र, अनेक दिवस उलटूनही पीएमपी कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित होते.

यासंदर्भात दै.‘पुढारी’ने यापूर्वी अनेकदा वृत्त प्रसिध्द केली अन् अखेर सोमवारी पीएमपी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याची घोषणा झाली. ‘पुढारी’ ने पीएमपी कर्मचार्‍यांचा हा प्रश्न अनेकदा मांडला. त्यामुळे पीएमपी कर्मचार्‍यांनी सोमवारी सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर ‘पुढारी’चे आभार मानले. सोमवारी पार पडलेल्या पीएमपी कर्मचार्‍यांच्या बैठकीत पीएमपी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी याबाबत घोषणा केली.

या वेळी ‘बाळासाहेबांची शिवसेना पक्षा’चे पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे, पीएमटी कामगार संघाचे राजेंद्र खराडे, पीएमपी राष्ट्रवादी संघटनेचे सरचिटणीस सुनील नलावडे, पीएमपी महासंघाचे बबनराव झिंझुर्डे, पीएमपी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे नानासाहेब सोनावणे, राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे संदीप खोपडे व अन्य उपस्थित होते.

या केल्या सूचना
पीएमपीच्या सर्व कर्मचार्‍यांची बैठक सोमवारी पार पडली. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी या वेळी पीएमपी अध्यक्षांना विविध सूचना केल्या. यात नाना भानगिरे यांनीदेखील सूचना केल्या. यात पीएमपी कर्मचार्‍यांना पदोन्नती, कर्मचार्‍यांची वैद्यकीय बिलांची रक्कम द्यावी, प्रत्येक डेपोमध्ये अत्याधुनिक शौचालये, अशा विविध सूचना या वेळी करण्यात आल्या.

पीएमपी कर्मचार्‍यांना येत्या जानेवारी महिन्यात आम्ही 50 टक्के सातवा वेतन आयोग लागू करणार आहे. त्यानंतर उर्वरित वेतन आयोग मंत्रालयस्तरावर निर्णय झाल्यावर फेब्रुवारी महिन्यात लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल.

ओमप्रकाश बकोरिया,
                                           अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

पीएमपी कर्मचार्‍यांना सोमवारी झालेल्या बैठकीत 50 टक्के सातवा वेतन आयोग लागू झाला. ही महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे. उर्वरित वेतन आयोगसुद्धा लवकरच लागू व्हावा, याकरिता आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत.

                                                                         – नाना भानगिरे,
                                                         पुणे शहरप्रमुख, बाळासाहेबांची शिवसेना

 

Back to top button