पुणे : भ्रष्टाचाराची निर्मिती प्रशासकीय यंत्रणेतूनच! निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांचे मत

पुणे : भ्रष्टाचाराची निर्मिती प्रशासकीय यंत्रणेतूनच! निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांचे मत
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या सध्याच्या यंत्रणेतील भ्रष्टाचाराची निर्मिती ही राजकीयपेक्षा प्रशासकीय यंत्रणेतूनच होत असून, या यंत्रणेवर प्रभावी अंकुश ठेवण्यात सर्वच घटकांना अपयश येते आहे. भांडवलशाहीने सर्वच क्षेत्रे काबीज केल्यामुळेही भ्रष्टाचार बोकाळला आहे, असे मत निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केले. सहकारनगर येथील सहजीवन व्याख्यानमालेतील 'भ्रष्टाचार आणि सामान्य माणूस' याविषयावरील दुसरे पुष्प गुंफताना झगडे यांनी भ्रष्टाचाराच्या विविधपैलूंची मूलभूत मांडणी केली.

भ्रष्टाचार हा केवळ आर्थिक नसतो, असे नमूद करून त्यांनी प्रामुख्याने आर्थिक भ्रष्टाचाराचा वेध घेतला. एकाआंतरराष्ट्रीय संस्थेने जगातील सर्वच देशांमधीलभ्रष्टाचाराच्या प्रमाणाची पाहणी केली असता स्वीडन, नॉर्वे, फ्रान्स, जर्मनी आदी देशांत कमीतकमी भ्रष्टाचार होतो. या देशांना त्यात शंभरपैकी 88 गुण देण्यात आले. भारताचे गुण केवळ 40 आहेत. केवळ राजकीय भ्रष्टाचाराचीच जोरदार चर्चा होते, पण भ्रष्टाचाराला सर्वाधिक कारणीभूत असते ती प्रशासकीय यंत्रणा. अधिकार्‍यांकडून होणार्‍या या भ्रष्टाचाराकडे डोळेझाक होते, असे सांगून झगडे यांनी आपल्या कारकिर्दीतील अनेक उदाहरणे नमूद केली.

भ्रष्टाचाराने सामान्य माणसाची लूट होत असल्याचे मत व्यक्त करण्यात येते आणि राजकीय-प्रशासकीय यंत्रणेपेक्षा तो सर्वाधिक दीन आणि दुबळा असल्याचे मानले जाते. मात्र, खरी स्थिती उलटी आहे. लोकशाहीमध्ये सामान्य माणूस हाच राजा असून, लोकप्रतिनिधी-अधिकारी हे सेवक आहेत. लोकशाही मजबूत करणे हाच भ्रष्टाचारावरील खरा उपाय आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय हस्तक्षेपामुळे आपल्याला भ्रष्टाचारात सामील व्हावे लागते, असा कांगावा नोकरशाहीकडून म्हणजे प्रशासकीय अधिकार्‍यांकडून करण्यात येतो, मात्र प्रशासकीय अधिकार्‍यांनी ठरविले, तर ते भ्रष्टाचार थांबवू शकतात, असे झगडे यांनी सांगितले.

नैतिकता कुठे गायब झाली?
कोणत्याही मंत्र्याने जरी एखादा बेकायदेशीर आदेश दिला, तरी तो पाळण्याचे बंधन अधिकार्‍यावर नाही. असा आदेश लेखी मागणे आणि त्याची अंमलबजावणीच न करणे, हा अधिकार्‍यांचा अधिकार आहे. ती त्यांची कवचकुंडले आहेत. अधिकार्‍याची फारफार तर बदली होऊ शकते, मात्र त्याला भ्रष्टाचार थांबवता येतो. प्रत्यक्षात अधिकार्‍यांकडून होणार्‍या भ्रष्टाचाराचे प्रमाण मोठे आहे.

सार्वजनिक-शासकीय क्षेत्राबरोबरच खासगी क्षेत्रातील भ्रष्टाचारही मोठा आहे. भांडवल शाहीने सर्वच क्षेत्रांमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले असून, खरी लूट या भांडवलशाहीकडूनच होते आहे. त्यामुळे केवळ काही हातांमध्ये संपत्तीचे केंद्रीकरण होत असून, त्यावर उपाय करण्याची गरज आहे. केवळ एका धोब्याने संशय व्यक्त केल्याने रामचंद्रांनी पत्नीचा त्याग केला, म्हणजे या देशात एकेकाळी सर्वाधिक नैतिकता होती. ती नैतिकता आता कुठे गायब झाली, असा सवालही झगडे यांनी विचारला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news