पर्वती, पद्मावती भागांतील नागरिकांना सदोष वीजबिले | पुढारी

पर्वती, पद्मावती भागांतील नागरिकांना सदोष वीजबिले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पर्वती आणि पद्मावती विभागांतर्गत अनेक ग्राहकांना सदोष वीजबिले देण्यात येत आहेत. परिणामी, संबंधित नागरिकांना आर्थिक भुर्दंड पडत आहे, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिली. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित अभियंत्यांवर शिस्तभंगाची कारवाई सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आमदार भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ही माहिती दिली.

पर्वती, पद्मावती विभागांतर्गत अनेक ठिकाणी ग्राहकांना चुकीची वीजबिले देण्यात येत असल्याने नाहक आर्थिक भुर्दंड पडत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मीटर वाचनात तफावत, संबंधित यंत्रणेकडून होणार्‍या निष्काळजीपणामुळे चुकीची वीजबिल येत असून, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत, असे आमदार तापकीर यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ’पर्वती, पद्मावती विभागांतर्गत गेल्या तीन महिन्यांत नेहमीची वीजबिले भरण्याची टक्केवारी सुमारे 95 ते 96 टक्के इतकी आहे. वाढीव वीज देयकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास ग्राहकांच्या मीटर वाचनाची आणि प्रत्यक्ष वीज वापराची स्थळ तपासणी करून आवश्यकते नुसार देयक दुरुस्ती करण्यात येते.

ग्राहकाला वीज देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित ग्राहकाला उपविभागीय कार्यालय, महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल उपयोजन इत्यादी ठिकाणी तक्रार नोंदविण्याचे पर्याय उपलब्ध आहेत आणि त्या तक्रारीचे त्वरित निरसन करण्यात येते.’ दरम्यान, रास्ता पेठ शहर मंडळात ऑक्टोबर 2022 मध्ये पर्वती आणि पद्मावती या विभागात एका ग्राहकाला अवास्तव वीज देयकाबाबत माध्यमांमधून प्रसिद्ध झाले होते.

Back to top button