

कार्ला; पुढारी वृत्तसेवा : नाताळाच्या सुटीमुळे कार्ला परिसरातील विविध पर्यटनस्थळे व आई एकवीरादेवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांमुळे परिसरात गर्दी झाली होती. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाची दमछाक झाली. कार्ला वेहरगाव रोड जाम आई एकवीरादेवी, ऐतिहासिक कार्ला व भाजे लेणी, लोहगड, विसापूर किल्ले, महाराष्ट्र पर्यटन महामंडळ केंद्र तसेच विविध बंगलोमध्ये सुट्यांचा आनंद घेताना पर्यटक दिसत होते. पर्यटनाबरोबर महाराष्ट्रातील जनतेचे श्रद्धास्थान असलेली कार्ल्याच्या आई एकवीरादेवीचे दर्शन घेण्यासाठी कोळी, आग्री बांधवानी एकवीरादेवी मंदिर परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे कार्ला वेहरगाव रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.
रस्त्यावरच पार्किंगमुळे वाहन चालविताना कसरत
पर्यटकांनी कोठेही वाहनांची पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीत आणखीच भर पडली. त्यामुळे वाहन चालविताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. त्यामुळे चालकांनी व नागरिकांनी पार्किंगची सोय करण्याची मागणी केली आहे. कार्ला-वेहरगाव रोडवरील ही कोंडी सोडवण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांंच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक निरीक्षक नीलेश माने, सचिन रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासान प्रयत्न करताना दिसत होते.
स्थानिक नागरिक त्रस्त
नाताळाची सुटी असल्यामुळे परिसरातील पर्यटनस्थळांवर भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. वाहतूक कोंडीच्या समस्येला वेहरगाव, दहिवली गावातील नागरिकांनादेखील तोंड द्यावे लागत होते. सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे घराबाहेरदेखील निघता येत नव्हते.