बारामती : उपचारांतील हलगर्जीपणामुळे बाळाच्या मृत्यूचा आरोप | पुढारी

बारामती : उपचारांतील हलगर्जीपणामुळे बाळाच्या मृत्यूचा आरोप

बारामती; पुढारी वृत्तसेवा : प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या महिलेवर उपचारांसाठी डॉक्टर वेळेत हजर न राहिल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप संबंधित महिलेच्या पतीने केला आहे. याप्रकरणी त्यांनी उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांसह शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना निवेदन दिले आहे. संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
गोपाळ तुकाराम गायकवाड (रा. प्रतिभानगर, बारामती) यांनी याबाबत निवेदन दिले आहे.

डॉ. तुषार गोविंद गदादे यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 22 डिसेंबर रोजी गायकवाड यांच्या पत्नीच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी शिवनंदन हॉस्पिटलमध्ये डॉ. गदादे यांच्याकडे प्रसूतीसाठी दाखल केले. या वेळी त्यांचे नातेवाईक विशाल गायकवाड, ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ, नीलेश मोरे हेही हॉस्पिटलमध्ये हजर होते. डॉ. गदादे यांनी रुग्ण महिलेला तपासत रात्री साडेदहाच्या सुमारास प्रसूती करावी लागेल, नैसर्गकि प्रसूती होणार नाही, सिझर करावे लागेल, असे सांगितले.

त्यानंतर रात्री पावणेनऊच्या सुमारास डॉक्टर दवाखान्यातून निघून गेले. रुग्ण महिलेची प्रकृती बिघडू लागल्याने बल्लाळ यांनी फोन व मेसेजद्वारे तातडीने येण्याची विनंती डॉक्टरांना केली. रात्री साडेदहाच्या सुमारास बाळाचे पाय बाहेर आले. रात्री सव्वाअकराला डॉक्टर आले. त्यांनी आल्यानंतर बल्लाळ यांना बोलावून घेत प्रसूतीला उशीर झाल्याने बाळाचे हृदय बंद पडल्याचे सांगितले.

त्यानंतर बालरोगतज्ज्ञाकडे बाळाला हलविण्यात आले. परंतु, तेथील डॉक्टरांनी बाळ मृत झाल्याचे घोषित केले. कुटुंबीयांनी सरकारी रुग्णालयात बाळाचे शवविच्छेदन करीत पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. यात डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर करीत योग्य उपचार न केल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक सुनील महाडीक म्हणाले की, शवविच्छेदन अहवाल येताच तो शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठविला जाईल. त्यांच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही होईल.

आम्ही जबाबदार नाही : डॉ. तुषार गदादे
याप्रकरणी डॉ. तुषार गदादे म्हणाले की, संबंधित रुग्णाच्या नातेवाइकांनी आमच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. आमच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी रुग्ण महिला दाखल झाल्यानंतर आम्ही योग्य ते उपचार करीत सर्वतोपरी प्रयत्न केले. बाळाचा मृत्यू झाला. परंतु, त्याला आम्ही जबाबदार नाही.

Back to top button