पुणे : अंगणवाडी सेविकेच्या ’साथी’मुळे तो सापडला; सिगारेट पिल्याच्या कारणातून सोडले होते घर | पुढारी

पुणे : अंगणवाडी सेविकेच्या ’साथी’मुळे तो सापडला; सिगारेट पिल्याच्या कारणातून सोडले होते घर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बारा वर्षांच्या मुलाने सिगारेट प्यायल्याची तक्रार त्याच्या मित्रांनी घरच्यांकडे केली. हा प्रकार कानावर आल्यानंतर बहिणीने त्याला आईला सांगू का, म्हणत मारहाण केली. त्यानंतर मुलगा घरातून बेपत्ता झाला. मित्र, नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केल्यानंतरदेखील तो मिळून येत नाही असे असताना घरच्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, अंगणवाडी सेविकेच्या प्रसंगावधानामुळे सोलापूरला निघाला असताना रेल्वे स्थानकावर सापडला.

रेखा संजय गायकवाड असे अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. त्यांची मंगळवार पेठेतील जुना बाजार परिसरात अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीचे काम संपल्यानंतर पुणे रेल्वे स्टेशन परिसरात साथी संस्थेत काम करतात. शनिवारी मंगळवार पेठेत जुना बाजार परिसरातील एक बारा वर्षांचा मुलगा सिगारेट पीत असल्याची तक्रार त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी केल्यानंतर व बहिणीने मारहाण केल्यानंतर पळून गेला होता. तो रेल्वेने सोलापूरला पळून जाण्याच्या तयारीत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर भटकलेल्या नजरेने फिरत असताना तो साथी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या निदर्शनास आला.

त्यांनी त्याला रेल्वे स्टेशनमधील चाईल्ड रूममध्ये आणून विचारपूस केली. त्या वेळी त्याला कोठून आला, अशी विचारणा केली असता, त्याने गुलबर्गा येथून आल्याचे तेथील कर्मचार्‍यांना सांगितले. त्याच्याकडे घरच्यांपैकी कोणाचाही नंबर नसल्याने त्या मुलाला बालकल्याण समितीसमोर हजर करून संस्थेत दाखल करण्यात आले. याच दरम्यान साथी संस्थेत काम करत असताना मुलाबद्दल रेखा गायकवाड यांनी विचारणा केल्यानंतर मुलाने मान खाली घातली. मुलाचा फोटो त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये घेतला.

दरम्यान, सोमवारी सकाळी त्या अंगणवाडीच्या कामासाठी जुना बाजार येथील अंगणवाडीत जात असताना त्यांना बेपत्ता झालेल्या मुलाची आईच समोर भेटली. तिने आपला मुलगा बेपत्ता झाल्याबद्दल गायकवाड यांना सांगितले. त्यांनाही त्या मुलाचे वर्णन संस्थेत आलेल्या मुलाशी मिळतेजुळते वाटल्याने त्यांनी त्यांच्या मोबाईलमधील फोटो काढून मुलाच्या आईला दाखवला.

त्यावर मुलाच्या आईला फोटो दाखविल्यानंतर तो फोटो त्यांचाच मुलाचा असल्याचे खात्री झाली. त्यानंतर गायकवाड यांनी मुलाची आणि आईची भेट घडवून आणली आणि त्यानंतर बालसमितीसमोरील कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतरच त्या महिलेला मुलाचा ताबा मिळेल, असे त्यांना सांगण्यात आले. या वेळी मुलाच्या आईने अंगणवाडी सेविका गायकवाड यांचे आभार मानले. दोन दिवसांत मुलगा सर्व कायदेशीर पूर्तता केल्यानंतर आईकडे सुपूर्द केला जाईल.

मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आमच्या पोलिस ठाण्याकडे दाखल झाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच एका अंगणवाडी सेविकेच्या प्रसंगावधानेमुळे मुलगा तात्काळ सापडण्यास मदत झाली आहे. लवकर मुलाचा ताबा कायदेशीर पूर्तता करून आईकडे सुपूर्द केला जाईल.

                                                   – अमित शेटे,
                          सहायक पोलिस निरीक्षक, फरासखाना पोलिस ठाणे.

Back to top button