पुणे: बिकिनी’वर ‘ऑडिशन’ द्यायला सांगून १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, उद्योगपतीचे घृणास्पद कृत्य | पुढारी

पुणे: बिकिनी'वर 'ऑडिशन' द्यायला सांगून १३ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, उद्योगपतीचे घृणास्पद कृत्य

आळेफाटा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: मुंबईत फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवत आणि त्यासाठी बिकिनीवर ‘ऑडिशन’ घेण्याच्या निमित्ताने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आळेफाटा (ता.जुन्नर) येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणात चाकणमधील उद्योगपती राजेंद्र दगडू गायकवाड विरोधात आळेफाटा पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.२४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी उद्योजक गायकवाड हा फरार झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, १३ जून २०२२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे येथील एका हॉटेलच्या रूममध्ये मुलीची ‘ऑडिशन’ घ्यायची आहे, असे म्हणून पिडीत अल्पवयीन मुलगी व तिचे आई-वडिल यांना गायकवाड याने बोलावून घेतले. त्यांनतर हॉटेलच्या एका रूममध्ये गायकवाडने मुलीला नेऊन काही ‘डायलॉग’ बोलण्यास सांगितले. तसेच तिच्या आई-वडिलांना तुम्ही बाहेर बसा. तुम्हाला ती लाजत आहे, असे सांगून त्यांना बाहेर पाठवले.

८ नोव्हेंबर २०२२ रोजी गायकवाडने मुलीच्या वडिलांना पुन्हा फोन करून मी कामानिमित्त आळेफाटा येथे येत आहे. तेव्हा तुमच्या मुलीचे ‘ऑडिशन’ घेतो आणि तिच्यामध्ये काय सुधारणा झाली आहे का? ते पाहू म्हणत गायकवाड मुलीच्या राहत्या घरी आला. नंतर तिच्या आई वडिलांना घराच्या बाहेर पाठवून मुलीला करिअर करायचे असेल तर तुला ‘बिकनी’वर ‘ऑडिशन’ द्यावी लागेल असे म्हणाला. ‘बिकनी’वर ‘ऑडिशन’ देत असताना गायकवाडने पाठीमागून येऊन मुलीला मिठी मारली. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता धमकी देऊन बळजबरीने बालत्कार केला आणि तिथून निघून गेला. पोलिसांनी भादवि कलम ३७६(२)(आय), 354, 35अ(अ), 506 पोस्को 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनखाली सहायक पोलिस निरीक्षक रागिणी कराळे अधिक तपास करत आहेत.

Back to top button