इंदापुरात 18 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व | पुढारी

इंदापुरात 18 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

वालचंदनगर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे 12 ठिकाणी निवडून आलेले सरपंच व 6 ठिकाणी राष्ट्रवादीचे बहुमत असलेल्या सदस्यांची शिरगणती करत माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादीचे 18 ग्रामपंचायतींवर वर्चस्व असल्याचे दाखविले. ग्रामपंचायत निकालाची पोलखोल केल्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड झाल्याची बोचरी टीका भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.

भरणेवाडी, (ता. इंदापूर) येथे रविवारी (दि. 25) तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या वेळी भरणे म्हणाले, भाजपने 19 ग्रामपंचायतींवर केलेला दावा धादांत खोटा आहे. तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लढलेल्या 246 सदस्यांपैकी तब्बल 160 सदस्य राष्ट्रवादीचे निवडून आले आहेत. सध्या या ठिकाणी 12 गावचे नूतन सरपंच उपस्थित असून, सर्वच्या सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित आहेत.

असे असतानाही गैरसमज पसरवून स्वतःची पोळी भाजण्याचा विरोधकांचा स्वभाव जात नाही हे दुर्दैव. या वेळी कळाशी येथील नूतन सरपंच रूपाली गलांडे, कुरवली सरपंच राहुल चव्हाण, म्हासोबाचीवाडी सरपंच राजेंद्र राऊत, डिकसळ सरपंच मनीषा गवळी, रणगाव सरपंच योगेश खरात,न्हावी सरपंच आशा डोंबाळे, झगडेवाडी सरपंच अतुल झगडे,बोरी सरपंच मंदा ठोंबरे,जांब सरपंच समाधान गायकवाड, लाखेवाडी सरपंच चित्रलेखा ढोले,माळवाडी सरपंच मंगल व्यवहारे यांच्यासह डाळज नं 3 चे 7 पैकी 5 सदस्य, हिंगणगावचे 7 पैकी 5 सदस्य, अजोती (सुगाव) येथील 7 पैकी 5 सदस्य,पिंपरी (शिरसोडी) येथील 11 पैकी 11 सदस्य, डाळज नं 2 येथील 7 पैकी 5 सदस्य, तर बेलवाडी येथील 13 पैकी 7 सदस्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,प्रतापराव पाटील,हनुमंत कोकाटे आदी उपस्थित होते.

होय आम्ही राष्ट्रवादीच
मदनवाडी येथील सरपंच अश्विनी मारुती बंडगर या काही वैयक्तिक अडचणीमुळे वेळेत पोहचू शकत नसल्याने बंडगर यांनी माजी मंत्री भरणे यांना भ्रमणधवनी वरून फोन केला असता भरणे यांनी फोन स्पीकरवर केला. या वेळी बंडगर यांनी सर्वांना सांगितले,आम्ही राष्ट्रवादीचेच असून, तुमच्या सोबतच आहोत.

श्रेयासाठी घाईघाईने नागपूरहून परतले
येथील विरोधक नागपूरला अधिवेशनात आले होते.निकालादिवशी त्यांनी तेथे त्यांच्या वरिष्ठांना पेढे भरवत निकालाविषयी थापा मारल्या आणि खोटे श्रेय लाटण्यासाठी घाईघाईने नागपूरहून इंदापुरात पळत येऊन जनतेची दिशाभूल केल्याची टीका माजी मंत्री भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर केली.

Back to top button