

चाकण (ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या युनिट एक यांनी 14 वर्षांपूर्वीच्या खुनाचा उलगडा केला असून, यामध्ये पोलिसांनी चव्हाण गँगच्या संशयिताला खेड तालुक्यातील वाकी गावातून बेड्या ठोकल्या आहेत. आप्पा गोमाजी मोहिते (वय 50, सध्या रा. वाकी, ता. खेड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताने त्याची मैत्रीण ही त्याच्या अनैतिक संबंधामध्ये आडवी येत असल्याने तिचे पिंपरीतील केएसबी चौक येथून अपहरण केले. पुढे त्याने तिला स्वतःच्या घरात कोंडून ठेवले.
याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याने पुढे त्या मैत्रिणीचा निर्घृण खून केला. त्याने मृतदेहाची विल्हेवाट लावून तो नाव बदलून खेड तालुक्यातील वाकी या गावात राहत होता. चाकण एमआयडीसी परिसरात मिळेल ती मजुरी करत होता. संशयित आप्पा गोमाजी मोहिते हा चाकण परिसरात नाव बदलून राहत असल्याची व तो लवकरच औरंगाबाद येथे जाणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
मात्र, पोलिसांकडे त्याचा 15 वर्षांपूर्वीचा फोटो असल्याने चाकण एमआयडीसी परिसरात शोधणे कठीण झाले होते. चाकणजवळील वाकी भागात तो वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी वाकी परिसरात सापळा रचून रात्री त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता संबंधित तरुणी ही पत्नीकडून घटस्फोट घे व माझ्याशी लग्न कर; अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देत होती त्यामुळे तिचा खून केला असल्याचे कबूल केले. ही कारवाई गुन्हे शाखा एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलिस नाईक महाडीक, पोलिस नाईक सचिन मारे, पोलिस जवान गर्जे, महाले, पोलिस हवालदार कमले व तांत्रिक तपास पोलिस हवालदार माळी यांनी केला.