असून अडचण, नसून खोळंबा! पौडरोड परिसरातील पीएमपी बसथांब्यांची स्थिती | पुढारी

असून अडचण, नसून खोळंबा! पौडरोड परिसरातील पीएमपी बसथांब्यांची स्थिती

पौडरोड; पुढारी वृतसेवा : परिसरातील म्हतोबानगर येथील पीएमपी बसथांब्यावर गवत वाढले असून, त्याला झाडा, वेलींचा विळखा पडला आहे. तसेच त्या ठिकाणी कचराही टाकला जात आहे. परिसरातील इतर बसथांब्याची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. यामुळे या बसथांब्यांची अवस्था ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी झाली असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

या बसथांब्याच्या स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. बसथांबा उभारण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असला, तरी त्यांच्या देखभालीकडे सध्या दुर्लक्ष होत आहे. परिसरात ओढा असल्याने अनेक व्यावसायिक, नागरिक त्यात कचरा टाकतात. यामुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) बसथांब्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. तसेच परिसरात कचराही साचला आहे. कचरा डेपो येथील बसस्थानकाची परिस्थितीदेखील फार काही वेगळी नाही. भुसारी कॉलनी येथील बसस्थानकालगत हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने अनेक नागरिक या बसथांब्यात बसून चाय-नास्ता करत असतात. यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी जागा शिल्लक राहात नाही. याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

बसथांब्यांच्या स्वच्छतेची जबाबदारी पीएमपी अथवा महापालिका प्रशासनाने एकमेकांवर ढकलू नये. या ठिकाणी साचलेला कचरा तातडीने उचलून परिसराची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात यावी.

                                                                            -नीलेश शिंदे,
                                                               शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

 

Back to top button