कोंढवा : सर्वांसाठी नियम एकच असावा : आमदार रोहित पवार याचे मत | पुढारी

कोंढवा : सर्वांसाठी नियम एकच असावा : आमदार रोहित पवार याचे मत

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : ‘पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी एक आणि पुणे महापालिकेतील समाविष्ठ गावांसाठी एक, असा नियम असू नये. तर सर्वांना समान नियम असावा. उंड्रीसह 34 गावांतील नागरिकांच्या मागण्यांविषयी पुणे महापालिका आयुक्तांशी चर्चा केली जाईल तसेच हा विषय विधिमंडळात मांडला जाईल,’ असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. पुणे महापालिकेच्या जाचक कराविरोधात व मूलभूत सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी उंड्रीतील नागरिकांनी उपोषण सुरू केले आहे.

या आंदोलनाचा रविवारी सहावा दिवस होता. या आंदोलनाला शहर व जिल्ह्यातील विविध सर्वस्तरांतून पाठिंबा मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी रविवारी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या आंदोलनास पाठिंबा दिला. या वेळी त्यांना आंदोलक व नागरिकांशी संवाद साधला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनीदेखील आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, उंड्रीकरांच्या आंदोलनास विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा दिला असून, समाविष्ठ 34 गावांतील नागरिकांचाही पाठिंबा मिळत आहे.

समाविष्ठ गावांच्या प्रश्नासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सांगून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे, अशी विनंती करणार आहे. जाचक करआकारणी व सोयी-सुविधांचा अभाव, हे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आहे. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून तातडीने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

                                                                    – साईनाथ बाबर ,
                                                    शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना

Back to top button