‘बीआरटी’ थांब्यांची ‘धुलाई’! पीएमपी, मनपा संयुक्तपणे 117 बीआरटी थांब्यांची स्वच्छता करणार | पुढारी

‘बीआरटी’ थांब्यांची ‘धुलाई’! पीएमपी, मनपा संयुक्तपणे 117 बीआरटी थांब्यांची स्वच्छता करणार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह पिंपरी-चिंचवड भागात असलेल्या 117 बस थांब्यांची धुलाई, रंगरंगोटी आणि दुरुस्तीची मोहीम पीएमपी आणि महानगरपालिका प्रशासनाने संयुक्तपणे हाती घेतली आहे. त्यामुळे आता नेहमीच दयनीय अवस्थेत असलेल्या पीएमपी थांब्यांचा चेहरामोहरा बदलणार आहे.

पीएमपीएमएल आणि पुणे मनपा यांच्या वतीने संयुक्तपणे शहरातील बीआरटी थांबे आणि बीआरटी कॉरिडॉर नीटनेटके करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे नियोजन जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे पीएमपीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या स्वच्छतेच्या कामासाठी पीएमपीच्या डेपोकडील आणि मनपा क्षेत्रीय कार्यालयांतील स्वच्छता कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.

… ही कामे आहेत सुरू

  • बीआरटी थांब्यांची दुरुस्ती, तुटलेल्या लाईट्स, फरशा, दरवाजे खांब
  • थांब्यांवर चिकटवलेल्या जाहिराती हटविण्याचे काम
  • थांब्याला रंगरंगोटी
  • बीआरटी कॉरिडॉरला रंगकाम
  • बीआरटी मार्गाची स्वछता

शहरात असलेले बीआरटी मार्ग
1) संगमवाडी ते विश्रांतवाडी 2) येरवडा ते आपले घर 3) सांगवी फाटा ते किवळे 4) नाशिक फाटा ते वाकड चौक 5) काळेवाडी फाटा ते स्पाईन रोड 6) निगडी त दापोडी 7) स्वारगेट ते कात्रज 8) दिघी ते आळंदी (प्रस्तावित मार्ग)

जी 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर बीआरटी मार्गांच्या स्वच्छतेचे काम मनपाच्या साहाय्याने हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत सातारा रस्त्यावरील व अन्य ठिकाणचे असे मिळून एकूण 10 थांबे स्वच्छ करण्यात आले आहेत. लवकरच उर्वरित थांबे स्वच्छ, रंगरंगोटी आणि दुरूस्ती करून सज्ज असतील.

                                                                  – अनंत वाघमारे,
                                                    बीआरटी मॅनेजर, पीएमपीएमएल

Back to top button