उंड्रीकरांच्या उपोषणास समाविष्ट 34 गावांचा पाठिंबा | पुढारी

उंड्रीकरांच्या उपोषणास समाविष्ट 34 गावांचा पाठिंबा

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत समाविष्ट केलेल्या गावांना दुटप्पीपणाची वागणूक देण्यात येत आहे. या गावांतून कोट्यवधी रुपयांचा महसूल गोळा केला जात आहे. मात्र, त्या तुलनेत एकचतुर्थांशदेखील विकासकामे होत नाहीत. तसेच, भरमसाट करआकारणी केली जात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेप्रमाणे किंवा ग्रामपंचायतप्रमाणे करआकारणी करा; अन्यथा महापालिकेसमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा समाविष्ट 34 गावे कृती समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण यांनी दिला आहे.

मूलभूत सुविधा मिळण्यासाठी व कर आकारणी कमी करण्याच्या मागणीसाठी उंड्री गाव संघर्ष समितीचे बेमुदत उपोषण शनिवारी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. या आंदोलनात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारठकर, भाजप पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे, माजी नगरसेविका प्राची आल्हाट, कृती समिती सचिव संतोष ताठे, माजी सरपंच पोपटराव खेडेकर, सादबा पोकळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. या उपोषणाला शहर, जिल्ह्यातील विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. समाविष्ट 34 गावांतील प्रतिनिधी आता या उपोषणात सहभागी झाली आहेत.

गारठकर म्हणाले, ’राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी 34 गावांतील विकासकामे व जाचक कर आकारणीविषयी बोलून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.’ कामठे म्हणाले, ’अवाजवी करआकारणी संदर्भात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासनाने मानले तर ठीकच, नाहीतर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले जाईल.’ जगताप म्हणाले, ’महापालिकेच्या जाचक करआकारणी व दुटप्पीपणा सहन केला जाणार नाही.

अजित पवार यांच्याशी याबाबत लवकरच चर्चा केली जाईल.’ भानगिरे म्हणाले, ’करआकारणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी लवकरच चर्चा केली जाईल. तसेच, महापालिका आयुक्तांशी बोलून या प्रश्नावर तोडगा काढला जाईल.’ आल्हाट म्हणाल्या, ’समाविष्ट गावांमधील करआकारणी संदर्भात उंड्री संघर्ष समितीसोबत आम्ही आहोत. मी स्वत: वरिष्ठ आधिकार्‍यांशी बोलून जाचक करआकारणी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’

शहरात वीस हजार लोकसंख्येसाठी एक नगरसेवक, तर समाविष्ट गावांत लाखो लोकसंख्येसाठी अवघे दोन नगरसेवक आहेत. समाविष्ट गावांबाबत महापालिकेकडून दुजाभाव केला जात आहे. यामुळे आता नवीन जनगणना करून प्रभाग रचना व्हावी.

                                    – श्रीरंग चव्हाण, अध्यक्ष, समाविष्ट 34 गावे कृती समिती

Back to top button