पुणे : वीज कनेक्शन तोडण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक | पुढारी

पुणे : वीज कनेक्शन तोडण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सायबर चोरट्यांनी वीज कनेक्शन कापण्याची भीती घालून एकाच्या बँक खात्यातून सहा लाख 35 हजार रुपयांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत शिरीन मानकर (वय 44, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकर यांच्या मोबाइल क्रमांकावर चोरट्यांनी संपर्क साधला.

महावितरणमधून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. वीजबिल भरले नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. मानकर यांना चोरट्यांनी एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर मानकर यांच्या बँक खात्याची माहिती चोरट्यांना मिळाली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी ऑनलाइन पद्धतीने मानकर यांच्या बँक खात्यातून सहा लाख 35 हजार 406 रुपये लांबविले.

येरवड्यातील व्यक्तीला साडेचार लाखांचा गंडा
येरवडा येथील 79 वर्षीय व्यक्तीलादेखील वीज कनेक्शन कट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी 4 लाख 31 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. त्यांना पेमेंट अपडेट करण्याच्या बहाण्याने क्वीक सपोर्ट नावाचे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडून ही फसवणूक केली. याबाबत संबंधित व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button