पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या स्वातंत्र्यानंतर व महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अशा प्रकारे आपल्या राज्यातील नागरिकांचे आरोग्य कार्ड तयार करणारे शिंदे-फडणवीस हे पहिले सरकार आहे, असे राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांनी शनिवारी नवी सांगवी येथे सांगितले. महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्ट, आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानात आयोजित दोन दिवसीय अटल महाआरोग्य शिबिराचे राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या शिबिराला परमपूज्यनीय नारायण महाराज यांनी विशेष उपस्थिती दर्शवून शुभाशीर्वाद दिले. आरोग्यमंत्री सावंत पुढे म्हणाले, राज्य सरकारने महाराष्ट्रातील साडेतीन कोटी महिलांचा आरोग्य डेटा तयार केला आहे. आता नर्सरी ते कॉलेजमध्ये शिकणार्या 18 वषार्र्ंपर्यंतच्या मुलांचे आणि नंतर राज्यातील सर्व पुरूषांचा आरोग्य डेटा तयार केला जाणार आहे.
केवळ आरोग्य डेटा गोळा करून हे सरकार थांबणार नाही, तर राज्यातील प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य तपासण्या व उपचार उपलब्ध करून देणार असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी जगताप, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार, स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, माजी उपमहापौर नानी घुले, पुण्याचे सहधर्मादाय आयुक्त डॉ. सुधीरकुमार बुक्के, उपआरोग्य संचालक डॉ. राधाकृष्ण पवार, तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व मा.नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सहभागी हॉस्पिटलचे डॉक्टर व नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.