पुणे: फुकट अंडाराईस न दिल्याने ताणले पिस्तूल, स्वारगेट पोलिसांकडून सराईताला बेड्या | पुढारी

पुणे: फुकट अंडाराईस न दिल्याने ताणले पिस्तूल, स्वारगेट पोलिसांकडून सराईताला बेड्या

पुणे, पुढारी वृत्तसेवा: फूकट अंडाराईस देण्यास नकार दिलेल्या हातगाडी चालकाला पिस्तूलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी देत गल्ल्यातील पैसे घेऊन पसार झालेल्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व दोन काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. बंड्या उर्फ काळुराम प्रशांत थोरवे (30, रा. खडकमाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. स्वारगेट एसटी स्टॅण्ड परिसरात ही घटना घडली होती. याबाबत स्वारगेट पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

फिर्यादीची स्वारेगट भागात हातगाडी आहे. बंड्या हा फिर्यादीचा तोंड ओळखीचा असून त्याने फुकट अंडाराईसची मागणी केली. मात्र, फिर्यादीने नकार दिला. यामुळे राग अनावर झालेल्या बंड्याने फिर्यादीला पिस्तूलाच्या धाकाने जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, गल्ल्यातील अडीच हजार रुपये काढून तो पसार झाला. गुन्ह्यातील आरोपी बंड्या हा गुलटेकडी भागात आल्याची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, कर्मचारी मुकुंद तारू, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, शिवा गायकवाड, दिपक खेंदाड यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

Back to top button