काळ्या बाहुल्या, अर्धवट जळालेले फोटो, लिंबू, सुया… मध्यरात्री पुण्यातील वैकुठं स्मशानभूमीत चितेवर अघोरी प्रकार | पुढारी

काळ्या बाहुल्या, अर्धवट जळालेले फोटो, लिंबू, सुया... मध्यरात्री पुण्यातील वैकुठं स्मशानभूमीत चितेवर अघोरी प्रकार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत दोन तृतीयपंथीयांनी चितेजवळ अघोरी प्रकार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चितेजवळ फोटो, लिंबू, सुया हे साहित्य आढळले. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोन तृतीयपंथीयांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. मात्र, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेला एक जण पवई (मुंबई), तर दुसरा कोथरूडमध्ये राहणारा आहे. या प्रकरणी स्मशानभूमीतील सुरक्षारक्षकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास वैकुंठ स्मशानभूमी येथे घडली आहे. आरोपींकडून अघोरी कृत्य करण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या बाबत विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, शुक्रवारी (23 डिसेंबर) रोजी वर्षातली शेवटची अमावस्या होती. त्यापूर्वी गुरुवार 22 डिसेंबर रोजी रात्री तृतीयपंथीयांनी हा प्रकार केला आहे. हे दोन तृतीयपंथी मध्यरात्री वैकुंठ येथील स्मशानभूमीत आले होते. तेथे जळणार्‍या चितेजवळ जाऊन काळ्या रंगाच्या बाहुल्या, लोकांचे अर्धवट जळालेले फोटो, लिंबू, सुई, हळद-कुंकू घेऊन अघोरी कृत्य करीत होते.

हा प्रकार तेथील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आला. दोघे दुचाकीवरून आल्यानंतर सुरक्षारक्षकाला वाटले की, मयतासंदर्भात ते आले असतील. मात्र, काही वेळानंतर ते अघोरी कृत्य करीत असल्याचे लक्षात आले. त्याने ही माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ स्मशानभूमीत धाव घेऊन पाहणी केली असता दोघे तृतीयपंथी त्यांना अघोरी कृत्य करताना रंगेहाथ मिळून आले. गुन्हे निरीक्षक दादा गायकवाड तपास करीत आहेत.

Back to top button