भोसरीमध्ये वाहतूक नियमांचे होतेय सर्रास उल्लंघन

भोसरीमध्ये वाहतूक नियमांचे होतेय सर्रास उल्लंघन

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : भोसरी येथे सध्या वाहतूक कोंडीचा विळखा पाहण्यास मिळत आहे. येथे वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. त्याशिवाय, भोसरी येथील पीएमटी चौकाजवळ रस्त्यावरच फळ आणि खाद्यपदार्थ विक्रेते थांबलेले असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. त्याशिवाय, भोसरी-इंद्रायणीनगर, धावडे वस्ती आदी परिसरात शाळेतून ये-जा करणारया विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडणे जिकिरीचे होत आहे.

पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीच्या समस्येपासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून उड्डाणपुलाचा उभारणी करण्यात आली. मात्र, अद्यापही येथील नागरिकांची वाहतूक कोंडीपासून सुटका झालेली नाही. येथील रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्रेते, फळ विक्रेते यांच्या हातगाड्या पाहण्यास मिळतात. त्याचप्रमाणे येथील पदपथांवरदेखील अतिक्रमण झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. परिसरात होत असलेल्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालतानाही कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकर वाहतुकीची समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

शाळा, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना त्रास

धावडे वस्ती, इंद्रायणीनगर परिसरात असलेल्या शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणारर्या विद्यार्थ्यांना येथील वाहतूक समस्येमुळे त्रास सहन करावा लागत आहे. येथे शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेस रस्त्यावर खूप गर्दी झालेली दिसते. त्यात विरुद्ध दिशेने काही वाहनचालक वाहने दामटत असतात. अशा सर्व अडचणींवर मात करत विद्यार्थ्यांना आपल्या शाळेपर्यंतचा प्रवास पूर्ण करावा लागतो. या दरम्यान छोटे-छोटे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

वाहनचालकांचा 'शॉर्टकट'

भोसरी येथे पुणे- नाशिक मार्गालगत लोकवस्ती वाढलेली आहे. धावडे वस्ती, लांडगे वस्ती, चक्रपाणी वसाहत, आदर्शनगर आदी ठिकाणी वळण घेण्यासाठी जागा व सेवा रस्ता नसल्याने या परिसरातील नागरिक आणि व्यावसायिक अर्धा किलोमीटरचा प्रवास विरुद्ध दिशेने करतात. येथील महामार्गावर पेट्रोल पंपदेखील रस्त्याच्या एक बाजूला आहे. त्यामुळे पेट्रोल टाकण्यासाठीदेखील वाहनचालक विरुद्ध दिशेने येत असतात.  सरळ रस्त्याने प्रवास केला, तर एक ते दीड किलोमीटर पुढे जाऊन परत मागे यावे लागते. त्यामुळे मोठा फेरा पडतो. तो वाचवण्यासाठी वाहनचालक शॉर्टकटचा वापर करतात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news