आरोग्य केंद्रात वीज सुरळीत; उत्तमनगर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर | पुढारी

आरोग्य केंद्रात वीज सुरळीत; उत्तमनगर परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : दीड लाखांहून अधिक लोकसंख्येला आरोग्य सेवा पुरविणार्‍या उत्तमनगर येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य उपकेंद्राचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा शुक्रवारी पाच वर्षांनंतर सुरू करण्यात आला तसेच गोवर व इतर रोगांच्या लसीकरणापासून वंचित असलेल्या उपेक्षित बालकांची विशेष लसीकरण मोहीमही आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

या रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतेच वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने आरोग्य उपकेंद्राच्या वीज व इतर मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यातून उपकेंद्राचे थकीत वीज बिल भरण्यात आल्यानंतर महावीज वितरण कंपनीने नवीन मीटर बसवून उपकेंद्राचा वीजपुरवठा सुरू केला आहे. उत्तमनगर, कोपरे, कोंढवे धावडे, शिवणे परिसराचा महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.

मात्र, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने या परिसरात आरोग्य सेवा सुरू आहे. जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळे दाट लोकवस्तीच्या भागात आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. याबाबत दैनिक ‘पुढारी’ने नुकतीच बातमी प्रसिद्ध केली होती. अनियमित व अपुर्‍या आरोग्य सेवेचा फटका सर्वसामान्यांना बसला होता.

याकडे माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी जिल्हा परिषद व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची अखेर प्रशासनाने दखल घेतली आहे. उत्तमनगर, शिवणे भागांत लसीकरणापासून बालके वंचित असल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे. लसीकरणापासून वंचित असलेल्या सात बालकांना गोवरची लस देण्यात आली असून, अशा बालकांची शोध मोहीम आरोग्य विभागाने सुरू केली आहे.

महापालिकेत समावेश झालेल्या उत्तमनगर, कोंढवे, धावडे, शिवणे परिसरातील दीड ते दोन लाखांवर लोकसंख्या आहे. मात्र, महापालिका आरोग्यसेवा देत नाही, तर जिल्हा परिषदेची सेवा येथील लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी पडत आहे तसेच महापालिकेत समावेश झाल्याने जिल्हा परिषद उपकेंद्राना अनुदान देत नाही. महापालिकेने उत्तमनगर व शिवणे परिासरात तातडीने दवाखाने सुरू करणे गरजेचे आहे.

                                 – अनिता इंगळे, माजी सदस्या, जिल्हा परिषद

 

Back to top button