

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत एकूण 3 हजार 598 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 32 हजार 847 बालकांना व्हिटॅमिन एची मात्रा देण्यात आली आहे. कुदळवाडी येथे सुरुवातीला 29 नोव्हेंबरला 5 जणांना गोवरची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर थेरगाव परिसरातदेखील गोवरचे 2 रुग्ण आढळले. सध्या शहरातील विविध भागांमध्येदेखील गोवरचे रुग्ण आढळले आहेत.
गोवरबाधित रुग्णांची संख्या 26 पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यामध्ये गेल्या महिनाभरात नव्याने आढळलेल्या 22 गोवरबाधित बालकांचा समावेश आहे. तर, 4 बालकांना गेल्या वर्षभरात लागण झालेली आहे. शहरामध्ये 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गोवरचे एकूण 442 संशयित रुग्ण आढळले आहेत. महापालिकेतर्फे गोवर प्रभावित भागामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जात आहे. आत्तापर्यंत 3 लाख 10 हजार 469 घरांमध्ये सर्वेक्षण केले आहे. जवळपास 10 लाख 88 हजार 25 इतक्या लोकसंख्येचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या वतीने 5 वर्षाखालील 67 हजार 924 बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.