शिरूरमधील महत्त्वाची कामे मार्गी लागणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सकारात्मकता | पुढारी

शिरूरमधील महत्त्वाची कामे मार्गी लागणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सकारात्मकता

मंचर; पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभेतील प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मकता दाखवली आहे. त्यामुळे भविष्यात रस्ते, पूल इत्यादी कामे होण्यास मदत होईल, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील रखडलेले राज्य महामार्ग 60, खेड टोलनाका ते नाशिक फाटा या महामार्गांवरील एलिवेटेड कॉरिडोर प्रकल्पाचा तांत्रिक प्रक्रियेसह डीपीआर लवकरात लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हावे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक असलेल्या वढू-तुळापूरला जोडणार्‍या देहू-आळंदी-मरकळ-तुळापूर या 54.22 कोटी रुपयांच्या कामास केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत मंजुरी मिळावी यासह पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर ते शिरूर रस्ता रुंदीकरणाचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, आदी प्रमुख मागण्यांसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर माजी खासदार आढळराव पाटील यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

या संदर्भात बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, माझ्या मागण्याची मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीरतेने दखल घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सत्वर कार्यवाहीचे निर्देश देणार असल्याचे या वेळी सांगितले. यासह शिरूर लोकसभा मतदारसंघातील वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर आदी शहरांतून जाणार्‍या रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी असलेल्या पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूर ते शिरूर रस्ता रुंदीकरणाचे कामही लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठीदेखील आढळराव पाटील यांनी मागणी केली.

Back to top button