येरवडा : जागेच्या वादातून 9 जणांवर गुन्हा | पुढारी

येरवडा : जागेच्या वादातून 9 जणांवर गुन्हा

येरवडा; पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरील महालक्ष्मी लॉन्स येथे जागेच्या मालकीवरून झालेल्या भांडणात विमानतळ पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पार्वती जीवन पाटील (वय 37, रा. सोमवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधित घटनेची चौकशी करण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोहगाव येथील पाटील यांच्या मालकीच्या शेतजमिनीवर प्रीतम खांदवे (वय 39, रा. पाटील वस्ती, लोहगाव) यांनी प्रवेशव्दार बसवून ये-जा करण्यास मज्जाव केला तसेच पाटील व त्यांचे पती शेतजमिनीतून जाताना खांदवेनी महिलांना पाठवून प्रतिबंध केला.

यासह फिर्यादी पाटील यांना महिलांनी मारहाण केली. तेथील कर्मचार्‍यांनी पाटील यांच्या पतीला शिवीगाळ केल्याची तक्रार विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल आहे. या तक्रारीवरून प्रीतम खांदवे, गीता गायकवाड, सीमा हातागळे, सुरेखा गाडगीळ, संगीता गवळे, लक्ष्मी घुले, रुक्मिणी साळवे, जितेंद्र जाधव, नुर मोहम्मद शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीची तक्रार निराधार…
याबाबत प्रीतम खांदवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, फिर्यादी यांची तक्रार निराधार असून, घटनेच्या वेळी मी जागेवर नव्हतो. शेतजमिन गट क्रमांक 132/1 ही जागा आई प्रमिला प्रतापराव खांदवे यांच्या नावे आहे. जागेच्या 7-12 उतारावर फक्त आईचे नाव आहे, तर गट क्रमांक 132/2 ही बाजुची जागा प्रतापराव खांदवे यांची आर्धी आणि पार्वती पाटील व इतरांची आहे. महालक्ष्मी लॉन्स 132/1 मध्ये आहे. ते गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यांनी लॉन्समध्ये येऊन कामगारांना मारहाण केली.

तसेच लॉन्समध्ये कार्यक्रम सुरू असताना बंद पाडण्याचे काम केले. दोन्ही कुटुंबामध्ये जमिनीबाबत वाद होते. न्यायालयाने 1996 मध्ये आमच्या बाजुने निकाल देऊन त्यांना जमिनीत येण्यात मज्जाव केला आहे. आमच्यामध्ये करार झाला होता ते त्यांनी ते मान्य केले होते तरी देखिल ते तक्रारी करून गुंडाद्वारे कार्यक्रम बंद पाडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसदेखील राजकीय सुडाने काम करीत आहेत.

Back to top button