पुणे : टेस्टिंग, जिनोम सीक्वेन्सिंग वाढविण्याच्या सूचना | पुढारी

पुणे : टेस्टिंग, जिनोम सीक्वेन्सिंग वाढविण्याच्या सूचना

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रयोगशाळा चाचण्या वाढविणे आणि आरटीपीसीआर चाचणीवर भर देण्याच्या सूचना राज्याच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्हा यंत्रणा तसेच पालिकांना दिल्या आहेत. प्रत्येक आरटीपीसीआर नमुना जिनोमिक सीक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येईल. यामुळे नव्या व्हेरियंटकडे लक्ष देणे सहजशक्य होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
मागील काही आठवड्यांत राज्यात कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे.

मागील आठवड्यामध्ये रुग्णसंख्या पूर्वीच्या आठवड्याच्या तुलनेत 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. कोविड चाचण्या पॉझिटिव्ह येण्याचे शेकडा प्रमाण 0.29 एवढे आहे. संसर्ग होऊन रुग्णालयांमध्ये भरती होणार्‍या रुग्णांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत चालले असून, मागील आठवड्यामध्ये संपूर्ण राज्यात 16 रुग्ण भरती झाले. 22 डिसेंबर रोजीच्या अहवालानुसार राज्यात एकूण 134 क्रियाशील रुग्ण आहेत.

राज्यातील कोविड परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र चीन, जपान, अमेरिका, ब्राझील या देशांमध्ये रुग्ण वाढताना दिसत आहेत. विशेषत: चीनमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे माध्यमातील बातम्यांवरून दिसत आहे. चीनमध्ये कोविड विषाणूचा बीएफ 7 हा प्रकार अधिक वेगाने वाढताना आढळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनुकीय क्रमनिर्धारण व्यवस्थेची माहिती आणि आढावा घेण्यात आला.

1) भीती नको; पण काळजी घ्या.
2) मास्क सक्ती नाही; पण वरिष्ठ नागरिक आणि अतिजोखमीचे आजार असणार्‍या गर्दीच्या, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावा.
3) सर्व जिल्ह्यांनी टेस्ट ट्रॅक ट्रीट वॅक्सिनेट आणि कोविड अनुरीप वर्तन, या पंचसूत्रीचा वापर करावा.
4) प्रत्येक जिल्ह्यातील कोविड लसीकरण अधिक वेगाने होणे आवश्यक आहे आणि विशेषतः प्रिकॉशन डोसकडे अधिक लक्ष द्यावे.
5) रुग्णालयीन व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात यावी.

Back to top button