पुणे : बालरंगभूमी अजूनही आर्थिक नुकसानीतच | पुढारी

पुणे : बालरंगभूमी अजूनही आर्थिक नुकसानीतच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या बालनाटकांचे प्रयोग होत असले, तरी त्यांची संख्या तुलनेने कमी आहे. बालरंगभूमीला अजूनही आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. कोरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान, विकेंडला नाट्यगृहांच्या तारखा न मिळणे, सोमवार ते शुक्रवारच्या प्रयोगांना मिळणारा कमी प्रतिसाद, नाट्यगृहांचे न परवडणारे भाडे अन् नाट्यसंस्थांकडे असलेल्या आर्थिक निधीची कमतरता अशा विविध कारणांमुळे बालनाटकांचे प्रयोग करणे संस्थांना अडचणीचे होत आहे. बालरंगभूमी अजूनही आर्थिक नुकसानीतच आहे.

दोन वर्षे कोरोनामुळे बालनाटकांचे फारसे प्रयोग झाले नाहीत. पण, आता बालनाटकांचे प्रयोग होत असले, तरी त्याचे प्रमाण कमी आहे. बालनाटकांची उपेक्षा कधी थांबणार असा सवाल कलाकार-दिग्दर्शकांनी उपस्थित केला आहे. याविषयी बालरंगभूमी परिषदेचे प्रकाश पारखी म्हणाले, कोरोनामुळे दोन वर्षे बालरंगभूमीचा पडदा बंदच होता. आता बालनाटकांचे प्रयोग होत आहेत. परंतु, बालनाटकांची आर्थिक गाडी अजून रुळावर आलेली नाही. शाळा सुरू असूनही नाटकांना मिळणारा प्रतिसाद तुलनेने कमीच असल्याचे निर्मात्यांना बालनाट्यकांच्या निर्मितीत जोखीम पत्करणे आर्थिक नुकसानीचे वाटते.

त्यामुळे सध्या बालनाटकांचे 60 टक्केच प्रयोग होत आहेत. त्यात नाट्यगृहांच्या तारखा व्यावसायिक नाटकांना शनिवार आणि रविवार म्हणजे विकेंडला मिळत असल्याने बालनाट्य निर्मिती करणार्‍या संस्थांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे बालनाटकांना विकेंडला नाट्यगृहांच्या तारखाच मिळत नसून, सोमवार ते शुक्रवार प्रयोग घेतले तरी यादिवशी मुलांच्या शाळा अन् पालकांचे नोकरी-व्यवसाय असल्यामुळे प्रयोगांना येणारा प्रेक्षकच कमी झालेला आहे. त्यामुळे प्रयोग करणे संस्थांना परवडणारे नसल्याने बालनाटक करणे आत्ताच्या घडीला अवघड आहे.

बालनाटकांचे दिग्दर्शक देवदत्त पाठक म्हणाले, बालनाट्यांचे प्रयोग करणे सध्याच्या घडीला खूप अडचणीचे होत आहे. खासगी नाट्यगृहांचे भाडे प्रयोगांसाठी परवडणारे नाही. विकेंडला नाट्यगृहांच्या तारखा मिळत नसल्याने इतर दिवशी प्रयोग करणे आर्थिकदृष्ट्या नुकसानीचे होत आहे. एका प्रयोगामागे अंदाजे 50 ते 75 हजार रुपये खर्च करावा लागतो. ते संस्थांना परवडणारे नाही.

म्हणून नाट्यगृहांऐवजी संस्थांना छोट्या सभागृहांमध्ये प्रयोग करावे लागत आहेत. पुण्यात सुमारे 25 ते 27 नाट्यसंस्था बालनाटकांची निर्मिती करतात. पण, कोरोनामुळे आणि आत्ताच्या परिस्थितीमुळे नवीन नाटकेही बालरंगभूमीवर कमी प्रमाणात येत आहेत. संस्थांकडे प्रयोगांसाठीही पैसे नाहीत आणि नाट्यगृहांमध्ये त्यांना प्रयोग परवडणारे नाही.

 

 

Back to top button