

पुणे पुढारी ऑनलाईन : साताऱ्यातील मान खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पुणे पंढरपूर रोडवर मलठण स्मशानभूमीजवळ अपघात झाला आहे. बाणगंगा नदीच्या पुलाला लावलेल्या तारा तोडून जयकुमार गोरे यांची कार दरीत कोसळली. आमदार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जयकुमार गोरे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुबी रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. गोरेंच्या अंगरक्षकाची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भाजप आ. गोरे मुंबईहून आपल्या घराकडे निघाले होते. साताऱ्यातील फलटणजवळून वाहणाऱ्या बाणगंगा नदीच्या पुलावरुन जात असताना स्मशानभूमीजवळ त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात गाडी तब्बल 50 फूट नदीच्या पुलाचा कठडा तोडून दरीत कोसळली. ड्राइव्हरचे गाडीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आमदार जयकुमार गोरे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत इतरही तिघं होते. त्यांनाही गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे.