चुलत्यानेच केली पुतण्याची जमीन हडप; पारोडी येथील प्रकार | पुढारी

चुलत्यानेच केली पुतण्याची जमीन हडप; पारोडी येथील प्रकार

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : पारोडी येथील तत्कालीन गावकामगार तलाठ्यांच्या हाताखाली काम करीत असताना अधिकाराचा गैरवापर करीत सरकारी मूळ दस्तऐवजामध्ये छेडछाड करून स्वतःचे नाव घुसविल्याबाबतची तक्रार शिक्रापूर पोलिसांत मोहन केरभाऊ भालेकर यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, मोहन यांचे चुलते रामदास भालेकर यांनी हा प्रकार केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास बाबूराव भालेकर (रा. पारोडी, ता. शिरूर) हे गेल्या 1990 पासून 2005 या कालावधीदरम्यान दहिवडी पारोडी येथील गावकामगार तलाठी यांच्या कार्यालयामध्ये तलाठ्यांच्या हाताखाली खासगी इसम म्हणून कामाला होते. त्यांनी तत्कालीन तलाठी यांना हाताशी धरून तक्रारदार मोहन भालेराव यांच्या वडिलांच्या स्व:खरेदीची पारोडी गावच्या हद्दीतील जमीन गट नं. 2/1 मधील 05 एकर 02 गुंठे क्षेत्रामधील काही क्षेत्र हडप करून तत्कालीन गावकामगार तलाठी यांच्याशी संगनमत करून सरकारी मूळ दस्तऐवजामध्ये छेडछाड करून स्वतःचे नाव रामदास बाबूराव भालेकर असे घुसविले आहे.

तक्रारदार यांच्या मालकीच्या जमिनीमधील काही हिस्सा स्वतःच्या ताब्यात जबरदस्तीने घेऊन कब्जा केला आहे. तक्रारदाराचे चुलते रामदास बाबूराव भालेकर व तत्कालीन गावकामगार तलाठी यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस
करीत आहेत.

Back to top button