टाकळी भीमातील नागरिक बिबट्यामुळे भयभीत | पुढारी

टाकळी भीमातील नागरिक बिबट्यामुळे भयभीत

तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : टाकळी भीमा येथील ग्रामपंचायत सदस्य देविदास करपे यांच्या पोल्ट्रीच्या बाजूच्या शेतामध्ये बिबट्याचे दर्शन झाले. परिसरात सततच्या बिबटदर्शनाने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. याबाबत श्रीराम तरुण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटोळे यांनी बिबट्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

टाकळी भीमा येथील मुख्य रस्त्यावर मोठ्या बिबट्याचे दर्शन झाले. हा बिबट्या थोड्याच वेळात शेजारच्या वन विभाग क्षेत्रात फिरला आणि पुन्हा देविदास करपे यांच्या पोल्ट्रीच्या बाजूच्या शेतामध्ये गेला. याची माहिती ताबडतोब गावचे पोलिस पाटील प्रकाश करपे यांना त्यांनी सांगितली. त्यानुसार पोलिस पाटलांनी वन विभागास संपर्क केला.

दरम्यान, ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी बॅटरीचा वापर करावा. हालचाल दिसल्यास परिसरात फटाके वाजवावेत. शेतात काम करताना शेतकर्‍यांनी जमावाने राहावे, अशा सूचना वन विभागाने केल्या. दरम्यान, भीमा नदीलगत हा भाग बागायती क्षेत्र असल्याने आणि बिबट्याला लपण्यासाठी ऊसक्षेत्र आहे. परिणामी, बिबट्याचे दर्शन घडत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या घटनेनंतर येथील नागरिक भयभीत झाले असून, या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button