आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | पुढारी

आमदार मुक्ता टिळक यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी राजकीय मंडळींसह अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आ. टिळक या काही महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरूवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी नारायण पेठेतील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, विजय शिवतारे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त रितेशकुमार, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आदींसह शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी व पदाधिकार्‍यांनी अत्यदर्शन घेतले.

फुलांनी सजविलेल्या गाडीतून केसरी वाडा ते वैकुंठ स्मशानभूमी अशी अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हवेत तीन फैरी झाडत पोलिसांनी त्यांना सलामी दिली.

विधिमंडळात श्रद्धांजली
विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर यांनी शोक भावना व्यक्त केल्या. पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघातील भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांना शुक्रवारी विधानसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकल्याने ते यावेळी सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे विरोधकांनी पायर्‍यांवरच एकत्र येत टिळक यांना श्रद्धांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक प्रस्ताव मांडताना, मुक्ता टिळक यांच्या निधनाने एक उत्तम समाजसेविका आणि आदर्श लोकप्रतिनिधी आपण गमावल्या आहेत, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटपर्यंत लोकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितली. विधानपरिषदेमध्ये देखील टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी मांडलेला शोक प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

समर्पित नेतृत्व हरपले
आ. मुक्ता टिळक या मागील 30 वर्षांपासून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या, पदाधिकारी होत्या. त्यांच्या रूपाने पक्षाचे समर्पित नेतृत्त्व हरपले आहे. त्यामुळे पक्षाचे तसेच समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. आमच्यासाठी हा अत्यंत दु:खाचा दिवस आहे. पुण्याच्या राजकीय, सामाजिक पटलावर अत्यंत संघर्षशील नेतृत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. नगरसेविका, महापौर, आमदार म्हणून जनतेशी त्या जोडल्या गेल्या होत्या. टिळक घराण्याचा वारसा त्यांनी समर्थपणे जपला. त्यांच्यावर पक्षाने ज्या जबाबदार्‍या दिल्या, त्या त्यांनी निष्ठेने पार पडल्या.
                                                       – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

समाजकारण करणार्‍या नेत्या गेल्या
पक्षाने दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडणार्‍या आ. टिळक यांनी राजकारणात भरीव कार्य केले. संघर्ष करण्याची वेळ आली, तरी त्यांनी संघर्षाच्या काळात समाजकारण केले. लोकमान्यांचा विचार त्या जगल्या. तब्बेत बरी नसतानाही केवळ पक्षाच्या निष्ठेपोटी त्यांनी राज्यसभा आणि विधानपरिषदेचे मतदान केले. शेवटपर्यंत त्या आजाराशी लढत राहिल्या.

                                                       – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री

Back to top button